नवी दिल्ली - #MeToo चळवळीदरम्यान आरोप झालेले केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर भारतात परतले आहे. दरम्यान, आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत नंतर बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र राजीनामा देणार का, असे विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
आतापर्यंत सात भारतीय व एक परदेशी अशा आठ महिला पत्रकारांनी एम. जे. अकबर यांच्या लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. अकबर यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनीही दखल घेतली आहे. अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी केली जाईल, असे अमित शहा यांनी शनिवारी स्पष्ट केले.
अकबर यांना संरक्षण देता कामा नये, असा दबाव भाजपा नेतृत्वावर आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना अकबर यांच्यावर कारवाई न केल्यास काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष आपल्यावर तुटून पडतील आणि आपल्याविरोधात वातावरण तयार करतील, असे अनेक नेत्यांचे म्हणणे आहे.