नवी दिल्ली- #MeToo मोहीम ही वा-यासारखी पसरली आहे. या मोहिमेंतर्गत अनेक महिलांनी त्यांच्याबरोबर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. अनेक नेते, अभिनेते, पत्रकार या प्रकरणात अडकल्याचं दिसतंय. याचदरम्यान लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेला काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेNSUIचा राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज खान याने स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यानं दिलेला हा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी स्वीकारला आहे.फिरोज खान याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांनंतर त्यानं राजीनामा दिला आहे. तसेच पक्षाच्या अंतर्गत समितीनंही फिरोज खान याच्यावरील आरोपांची शहानिशा केली. तरीही या आरोपामुळेच त्यानं राजीनामा दिला असे, असंही अधिकृतरीत्या काँग्रेसनं सांगितलेलं नाही. फिरोज खान याच्यावर एका पत्राच्या माध्यमातून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. एका महिलेनं राहुल गांधींना पत्र लिहिलं आहे. या पत्रात NSUIचे अध्यक्ष फिरोज खान, काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचे प्रमुख चिराग पटनायक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. पत्रावर काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमच्या महिला दिव्या स्पंदना यांना चिरागच्या कृत्याबाबत त्या महिलेनं सांगितलं होतं. परंतु चिरागवर कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच फिरोज खान यांच्यावर छत्तीसगडमधील महिला काँग्रेस कार्यकर्तीनं लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. फिरोज खानवर जूनमध्ये हे आरोप झाले होते, त्यानंतर जवळपास 4 महिन्यांनंतर त्यांना पद सोडावं लागलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही #MeToo या मोहिमेचं समर्थन केलं आहे. आता वेळ आली आहे की, सगळ्यांनीच महिलांचा सन्मान केला पाहिजे. सत्य सर्वांसमोर आल्यास नक्कीच बदल होईल, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.कोण आहेत फिरोज खान ?जम्मू-काश्मीरमधल्या उधमपूरमध्ये राहणारे फिरोज खान याची 2017मध्ये NSUIच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. खान NSUIमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष होता. त्यानंतर त्यांची उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये NSUIचे प्रभारी महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. कायदा आणि मानवाधिकाराचा अभ्यास करणा-या फिरोज खान याच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आरटीआय कार्यकर्त्याच्या माध्यमातून झाली. त्याला जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये NSUIला उभं करण्याचं श्रेय जातं.
#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खानचा राहुल गांधींनी घेतला राजीनामा, लैंगिक अत्याचाराचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 3:10 PM