मुंबई : प्रख्यात लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे यांनी मीटू मोहिमेला पाठिंबा देत, स्वत:वर बेतलेला प्रसंग उघड केला आहे. लैंगिक गैरवर्तनाचे अनुभव मलाही आलेत. एका माजी केंद्रीय मंत्र्याने तर मला एका रात्रीसाठी विचारणा केली होती, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. मात्र त्याचे नाव न सांगता ते आता हयात नाहीत, एवढेच त्यांनी म्हटले आहे.त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन नुकतेच झाले. त्यानिमित्ताने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'मी टू' मोहिमेविषयी त्या म्हणाल्या, ह्यमी लहानपणीच लैंगिक गैरवर्तनाचा किळसवाणा अनुभव घेतला. पुण्यात सायकलवरून जात असताना, एका रोडरोमिओने माझी छेड काढली होती. पोलीस स्टेशनपर्यंत त्याने पाठलाग केला. मला पोलिसांत तक्रार दाखल न करण्याचा सल्ला जवळच्यांनीच दिला.'सिनेसृष्टीतील अनेक पुरुषांनी बळजबरीने माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. एकदा कार्यक्रमातून निघताना एका केंद्रीय मंत्र्याने मला घरी सोडण्याची इच्छा व्यक्त केली. मी निघाले, तेव्हा, माझ्यासोबत एक रात्र घालवशील का? अशी विचारणा करणारी चिठ्ठी त्यांनी मला दिली. मी त्यांना स्पष्ट नकार दिला,' असेही सांगून सई परांजपे म्हणाल्या, की मी टूद्वारे अनेक महिला आवाज उठवत आहेत. या मोहिमेतून काहीतरी ठोस निष्पन्न व्हायला हवे.
#MeToo: केंद्रीय मंत्र्यानं एका 'रात्री'साठी विचारलं होतं!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 5:24 AM