विकास झाडे -नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे दिल्लीमध्ये १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला असून मेट्रो सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्येही कडक निर्बंधांची मुदत १७ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. दिल्लीत अपुऱ्या वैद्यकीय सुविधा आणि ऑक्सिजनची कमतरता असल्याने रुग्णांचे हाल होत होते. परंतु गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीला ऑक्सिजन मिळायला लागले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. दिल्लीत औषधांच्या काळ्याबाजारालादेखील ऊत आला आहे. चढ्या किमतीत वैद्यकीय उपकरणे आणि सेवा मिळत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दावा केला की, लॉकडाऊनमुळे दिल्लीतील कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण ३५ टक्क्यांवरून २६ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे. २६ एप्रिलपासून लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात आमच्या सरकारने दिल्लीतील वैद्यकीय सुविधांत सुधारणा करण्यासाठी पावले उचलली. रुग्णशय्यांची संख्या वाढविली. ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्न दिल्ली सरकार केंद्राच्या मदतीने सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. दिल्लीत औषधांची टंचाई जाणवत असून ती दूर करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे. सध्या सुरू असलेला लॉकडाऊन हा कडक स्वरूपाचा असून दिल्लीतील मेट्रो सेवादेखील बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.दिल्लीमध्ये रविवारी कोरोनाचे आणखी १७,३६४ नवे रुग्ण आढळून आले, तसेच आणखी ३३२ जणांचा मृत्यू झाला.
दिल्लीत मेट्रो सेवा संपूर्ण बंद; लॉकडाऊनही वाढविला, उत्तर प्रदेशमध्येही १७ मेपर्यंत कडक निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 6:09 AM