नवी दिल्ली - मनुष्यबळ विकास मंत्रालयातील पदवीचा वाद नवीन सरकारमध्ये देखील कायम असल्याचे चित्र आहे. नव्याने मनुष्यबळ विकास मंत्रीपदी विराजमान झालेले रमेश पोखरियाल निशंक यांची पदवी देखील खोटी असल्याचे आरोप होत आहेत. याआधीच्या मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या डिग्रीवरून देखील मोठा वाद निर्माण झाला होता.
पोखरियाल यांना श्रीलंकेतील विद्यापीठाने दोन डॉक्टरेट पदव्या दिल्या आहेत. परंतु, हे विद्यापीठ श्रीलंकेतील नोंदणीकृत नसल्याचे सांगण्यात येत आहे. ९० च्या दशकात कोलंबोमधील मुक्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने निशंक यांना शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल डी.लीटने सन्मानित केले होते. त्यानंतर काही वर्षांनी त्याच विद्यापीठाकडून पोखरियाल यांना पुन्हा डी.लीटची पदवी बहाल करण्यात आली. यावेळी विज्ञान क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना डी.लीटने सन्मानित करण्यात आले होते. परंतु, धक्कादायक म्हणजे हे विद्यापीठ श्रीलंकेत विदेशी किंवा अंतर्गत विद्यापीठ म्हणून नोंदणीकृतही नाही. श्रीलंकेतील विद्यापीठ अनुदान आयोगाने याची पुष्टी केली आहे.
गेल्या वर्षी देहरादूनमध्ये आरटीआय अंतर्गत मागविण्यात आलेल्या माहितीत हे समोर आले आहे. आरटीआयमधून निशंक यांचा अर्धवट बायोडाटा प्राप्त झाला आहे. निशंक यांचा बायोडाटा आणि पासपोर्ट यातील जन्मतारिख देखील वेगवेगळ्या दिसून आल्या आहेत. बायोडाटामध्ये पोखरियाल यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५९ दाखविण्यात आला आहे. तर पासपोर्टमध्ये पोखरियाल यांची जन्मतारिख १५ जुलै १९५९ नमूद करण्यात आलेली आहे.
मुळात ५ जुलै १९५८ रोजी उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील पीनानी गावात जन्मलेले निशंक यांनी हेमवती बहुगुणा गढवाल विद्यापीठातून आपली पदवी पूर्ण केली. त्यांच्याकडे पीएचडी ऑनर्स आणि डी.लीट ऑनर्स डिग्री आहे. जोशीमठ स्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरस्वती शिशू विद्यामंदीरात त्यांनी शिक्षक म्हणून काम पाहिल्याचे सांगण्यात येत आहे.
स्मृती इराणींच्या डिग्रीवरही होते प्रश्नचिन्ह
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या सरकारमधील मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या डिग्रीवरून देखील वाद झाला होता. २००४ ते २०१४ या कालावधीत इराणी यांनी दिलेली आपली शैक्षणिक माहिती वेगवेगळी असल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. २००४ साली स्मृती इराणी यांनी प्रतिज्ञापत्रात दिल्ली विद्यापीठातून आर्टमध्ये डीग्री पूर्ण केल्याचे म्हटले होते. मात्र २०१४ मध्ये प्रतिज्ञापत्रात स्मृती यांनी दिल्ली विद्यापीठात वाणिज्य विभागातून डिग्री घेतल्याचे नमूद केले होते. या डिग्रीवरून २०१९ लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला होता.