नवी दिल्ली/श्रीनगर - पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटवर एअरस्ट्राइक करून घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पण दक्ष असलेल्या भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी हा हल्ला हाणून पाडला होता. मात्र या आणीबाणीच्या परिस्थितीत हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होऊन सहा जवानांसह सात जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या अपघाताविषयी धक्कादायक खुलासा झाला असून, एअर ट्रॅफीक कंट्रोलमध्ये असलेल्या हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने केलेल्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ॉ
हवाई दलातील सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार एटीसी टॉवरमध्ये उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांपैकी एकाने सुरुवातीला एमआय-17 चॉपरला तळावर परतण्यास ग्रीन सिग्नल दाखवला होता. मात्र दुसरीकडे एअर डिफेंस युनिटला एअरबेसवर कुठलेही विमान उतरणार नसल्याची सूचना दिली होती. एमआय-17 चॉपर एका मोहिमेवर जात असताना या अधिकाऱ्याने त्याला परत श्रीनगर येथील एअर बेसवर परतण्यास सांगितले होते. तर एअर डिफेन्सच्या अधिकाऱ्यांनी आपले कुठले विमान किंवा हेलिकॉप्टर एअर बेसवर येत आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या अधिकाऱ्याने आपले कुठलेही चॉपर किंवा एअरक्राफ्ट बेसवर येत नसल्याचे सांगितले होते, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी याआधी कोर्ट ऑफ इन्क्वायरी पूर्ण झाली आहे. मात्र ट्रायलला सामोरे जात असलेल्या अधिकाऱ्यांनी अधिक साक्षीदारांची तपासणी व्हावी अशी मागणी केल्याने पुन्हा तपास सुरू झाला आहे. या प्रकरणी एअर ट्रॅफीक कंट्रोलमध्ये उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्यासह एअर बेसवरील डिफेन्समध्ये तैनात असलेल्या एका अधिकाऱ्याचेही कोर्टमार्शल होण्याची शक्यता आहे. 27 फेब्रुवारी श्रीनगरजवळ लष्कराचे एमआय-17 व्ही5 हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले होते. पाकिस्तानने एअर स्ट्राइकला प्रत्युत्तर देण्याच्या केलेल्या प्रयत्नांदरम्यानच हा अपघात झाला होता.