नवी दिल्ली: एमआय १७ चॉपर अपघातप्रकरणी भारतीय हवाई दलाकडून दोघांचं कोर्टमार्शल करण्यात येणार आहे. तर इतर चार अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई केली जाणार आहे. श्रीनगरमध्ये २७ फेब्रुवारीला एमआय १७ चॉपर कोसळलं होतं. भारतीय हवाई दलाकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रामुळे हा अपघात झाला होता. एम १७ चॉपर अपघातप्रकरणी भारतीय हवाई दल एकूण सहा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे. यापैकी दोन अधिकाऱ्यांचं कोर्टमार्शल करण्यात येईल. 'या प्रकरणात ग्रुप कॅप्टन आणि विंग कमांडर यांनी अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला. त्यामुळे हवाई दलाच्या सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला,' अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला संरक्षण दलातील सूत्रांनी दिली. या प्रकरणात आणखी चार अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल. त्यामध्ये दोन जण एअर कमांडर आणि दोन फ्लाईट लेफ्टनंट्सचा समावेश आहे.पुलवामात १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. यानंतर २६ फेब्रुवारीला भारतीय हवाई दलानं बालाकोटवर एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्ताननं २७ तारखेला भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या कारवाईदरम्यान भारतीय हवाई दलाच्या एम १७ चॉपरला अपघात झाला. श्रीनगरमध्ये असलेल्या स्पायडर सुरक्षा यंत्रणेकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रामुळेच एम १७ कोसळल्याची माहिती समोर आली होती.