लष्कराच्या हेलिकॉप्टरला तमिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान MI-17V5 हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत प्रवास करत होते. हेलिकॉप्टर जंगल परिसरात कोसळलं. त्यानंतर हेलिकॉप्टरनं पेट घेतला. या घटनेच्या चौकशीचे आदेश लष्कराकडून देण्यात आले आहेत. (Bipin Rawat Helicopter Crash)
सीडीएस बिपिन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली. त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. अपघात झाला त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये १४ जण होते. बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत त्यांच्यासोबत होत्या. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची आणि तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पीटीआयनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.
लष्कर वापरत असलेलं MI-17V5 हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानलं जातं. रशियन बनावटीच्या या चॉपरमध्ये दोन इंजिन असतात. व्हिआयपींच्या प्रवासासाठी या विमानाचा वापर केला जातो. व्हिआयपी या विमानातून उड्डाण करण्यापूर्वी अनेक प्रोटोकॉल्स पूर्ण केली जातात. विमानाची देखभाल, हवामान यांची अनेकदा पडताळणी केली जाते. मात्र तरीदेखील हा अपघाताचं नेमकं कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान प्राथमिक माहितीनुसार, बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंगटन इथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही सोबत होते. वेलिंगटनमध्ये आर्मीचं कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर नियोजित होतं. ऊटी कुन्नूरजवळ निलगिरी जंगल हे अतिशय घनदाट जंगल आहे. या जंगलात हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर परिसरात आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यांची सीमा निलगिरी जंगलालगत आहेत.