कुन्नूर: तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. त्यामध्ये देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि लष्कराच्या ११ जणांचं निधन झालं. हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर दुर्घटनास्थळी भयावह परिस्थिती होती. घटनेचा माहिती मिळताच बचाव दल पोहोचलं. मात्र त्याआधी स्थानिकांनी मदतकार्य सुरू केलं होतं.
हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्याखालून दोघांना जिवंत बाहेर काढण्यात आलं. त्यात सीडीएस बिपिन रावत यांचादेखील समावेश होता. बर्लियार हॅमलेटचे रहिवासी असलेल्या प्रकाश यांनी हेलिकॉप्टर १०० फूटांवरून दुर्घटनाग्रस्त होताना पाहिलं. 'सकाळी बरंच धुकं होतं. मी घरातून हेलिकॉप्टर उडताना बघितलं. तेव्हा ते २०० मीटर अंतरावर होतं. चॉपर एका मोठ्या झाडाला धडकलं आणि स्फोटासारखा आवाज झाला. त्यानंतर आसपास राहणारे लोक घरातून बाहेर आले,' असं प्रकाश यांनी सांगितलं.
दुर्घटनास्थळापासून काही अंतरावर राहणारे शिवकुमार यांनी अंगावर काटा आणणारा घटनाक्रम कथन केला. 'पेट घेतलेल्या हेलिकॉप्टरमध्ये ११ जण होते. तर ३ जण चॉपरपासून काही अंतरावर पडले होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानं कदाचित ते दूर फेकले गेले असावेत किंवा त्यांनी शेवटच्या क्षणी जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या असाव्यात. त्यांच्या शरीरावर गंभीर स्वरुपाच्या जखमा होत्या,' असं शिवकुमार यांनी सांगितलं.
बचाव दलाला मदत कार्य करताना अडचणी येत होत्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल पोहोचू शकेल यासाठी रस्ताच नव्हता. त्यामुळे स्थानिकांनी जवळच्या नदीतून, घरातून भांड्यांमधून पाणी आणलं आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. दोघांना जिवंत बाहेर काढण्यात आले. त्यात रावतदेखील होते, असं एन. सी. मुरली यांनी सांगितलं. 'रावत यांना बाहेर काढण्यात आलं. त्यावेळी त्यांनी त्यांचं नाव सांगितलं. रुग्णालयात नेताना त्यांचं निधन झालं. रावत यांच्या शरीराच्या खालील भागाला गंभीर स्वरुपाची इजा झाली होती,' असं मुरली यांनी सांगितलं.