लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टच्या सेवा एका चुकीच्या अपडेटमुळे अनेक ऑनलाइन सेवा विस्कळीत झाल्या. त्यानंतर विविध यंत्रणा तब्बल १७ तासांनी सुरू झाल्या. या आऊटेजचा जगभरातील विंडोजवर चालणाऱ्या तब्बल ८५ लाख संगणक व इतर उपकरणांना बसला. मात्र, याची व्याप्ती केवळ एक टक्के उपकरणांपर्यंतच असल्याचा दावा मायक्रोसॉफ्टने केला. या एक टक्के उपकरणांमुळे कोट्यवधी लोकांना फटका बसला आहे.
शनिवारी पहाटे ३च्या सुमारास देशभरातील विमानतळांवरील सेवा पूर्ववत झाली. त्यानंतर हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र, रद्द तिकिटांचे पैसे परत मिळण्यास किमान ५ दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे इंडिगोने सांगितले. रद्द तिकिटांचा परतावा मिळण्यासाठी विमान कंपन्यांवर लक्ष ठेवून असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
मिनीॲपोलिस, अमेरिका काही विमानतळांवर समस्या कायमदिल्ली, चेन्नई येथील विमानतळांवर चेहरा ओळखणारी 'डिजीयात्रा' ही यंत्रणा अजूनही प्रभावित आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवेश घेण्यास विलंब होत आहे. एअर इंडियाने सांगितले की, शनिवारी कोणतेही उडाण रद्द केलले नाही. काही विमानांना विलंब झाला. आमच्या आयटी यंत्रणेवर कोणताही परिणाम झाला नाही, असे कंपनीने स्पष्ट केले.
क्राउडस्ट्राइकच्या तांत्रिक चुकीमुळे सर्वाधिक फटका जगभरातील विमानसेवेला बसला. प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी जगभरात ७ हजारांपेक्षा उड्डाणे रद्द करण्यात आली. २१ हजारांपेक्षा जास्त जगभरातील उड्डाणांवर परिणाम झाला. केवळ अमेरिकेत १,१०० उड्डाणे रद्द झाली. तर, १,७०० उड्डाणांना विलंब झाला. भारतात शनिवारी १६ उड्डाणे रद्द झाली, तर ३० विमानांना विलंब झाल्याची माहिती देण्यात आली.
१,५०० पेक्षा जास्त विमाने जगभरात शनिवारी रद्द करण्यात आली. विमान वाहतुकीवर आणखी काही दिवस परिणाम राहू शकतो, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
...म्हणून रेल्वेवर कोणताही परिणाम नाहीभारतीय रेल्वेच्या सेवेला मायक्रोसॉफ्ट आऊटेजचा फटका बसला नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे, भारतीय रेल्वेने 'वाय२के' समस्या सोडविण्यासाठी १९९९मध्ये सीआरआयएस'ने प्रवासी आरक्षण यंत्रणा विकसित करण्यात आली होती. रेल्वेच्या सेवा यावर असून क्लाऊडचा वापर केलेला नाही.
क्राऊडस्ट्राइकच्या सीईओंकडून माफीनामाजगभरात लाखो लोकांना फटका बसल्यानंतर क्राऊडस्ट्राइकचे सीईओ जॉर्ज कर्ट्स यांनी झाल्या प्रकाराबद्दल अखेर माफी मागितली. मात्र, सर्व यंत्रणा सर्वसामान्यपणे काम करण्यासाठी काही वेळ लागू शकतो. कर्ट्स यांनी शुक्रवारी कोणत्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त न केल्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.