सीतामढी : बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील एका शासकीय माध्यमिक विद्यालयात मध्यान्ह भोजन घेतल्यानंतर 54 मुलांची प्रकृती बिघडली. त्यांनी खाल्लेल्या खिचडीची तपासणी करताना त्यात लांबलचक काळ्या रंगाचे अवशेष आढळले. हे अवशेष सापाचे असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुरसंडचे विभाग विकास अधिकारी विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरसंडच्या मेघपूर माध्यमिक विद्यालयातील विद्याथ्र्यानी शाळेत मिळणारे दुपारचे जेवण घेतल्यानंतर त्यांना उलटय़ा सुरू झाल्या व ते बेशुद्ध झाले. या मुलांना जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या मुलांना दिलेल्या खिचडीची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यात सापसदृश अवशेष आढळून आले. अवशेषांचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे, असे सूत्रंनी सांगितले. एक वर्षापूर्वी बिहारच्या सारन जिल्ह्याच्या धर्मासती गंडामन गावातील एका प्राथमिक विद्यालयात मुलांना देण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनात कीटकनाशक मिसळल्या गेल्याने 23 मुलांचा मृत्यू झाला होता. (वृत्तसंस्था)