व्यंकटेश केसरी, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे गुजरातेत भाजपाकडून मुदतीपूर्वच निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, असा अंदाज काँग्रेसकडून लावण्यात आला आहे. वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या मते गुजरातेत पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. रूपानी हे भाजपाचे सर्वाधिक कमजोर मुख्यमंत्री आहेत. तथापि, हे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वासाठी वरदानच ठरले. राज्याच्या कारभाराचा ताबा घेणे केंद्रीय नेतृत्वाला सोपे झाले, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.
काही काँग्रेस नेत्यांच्या मते, कोविड साथ नीट न हाताळल्यामुळे रूपानी यांना हटविण्यात आले आहे. काहींना वाटते की, राज्यात आपचा प्रभाव वाढल्यामुळे त्यांना जावे लागले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते परेश धनानी यांनी सांगितले की, भाजपाचे केंद्रीय नेतृत्व राज्यावरील पकड गमावणारनाही.
पुढील वर्षी निवडणुका
विधानसभेच्या मुदतीनुसार, गुजरातेत पुढील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका व्हायला हव्यात. तथापि, पुढील वर्षी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेच निवडणुका लावल्या जाऊ शकतात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणकीसोबत किंवा पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूर विधानसभा निवडणुकांसोबत गुजरातच्या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, असे काँग्रेसला वाटते.