लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: राजस्थानमध्ये या महिन्याच्या प्रारंभी झालेल्या विमान अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील मिग-२१ विमानांची उड्डाणे थांबविण्यात आली आहेत. या अपघातामागचे नेमके कारण समजल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल.
राजस्थानमधील सुरतगड येथून ८ मे रोजी उड्डाण केलेले भारतीय हवाई दलाचे मिग-२१ बायसन विमान हनुमानगड येथील एका गावातील घरावर कोसळले होते. या अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत मिग-२१ची उड्डाणे थांबविण्यात आली आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
किती विमाने?हवाई दलात मिग-२१ विमानांच्या तीन स्क्वाइन असून, ही विमाने २०२५ पर्यंत ताफ्यातून काढून टाकण्यात येतील.
कशामुळे निर्णय?राजस्थानमध्ये उड्डाण प्रशिक्षणासाठी झेपावलेले मिग-२१ विमान कोसळले. यात ३ ठार व विमानाचा पायलट जखमी झाला होता. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी हवाई दलाने चौकशी सुरू केली आहे.
मिग-२१ला होणारे अपघात हा चिंतेचा विषयभारतीय हवाई दलाकडे मिग- २१ विमानांच्या तीन स्वाड्रनसह लढाऊ विमानांच्या ३१ स्वाड्रन आहेत. १९६० च्या दशकात मिग-२१ विमानांचा हवाई दलात समावेश करण्यात आला. मिग-२१ विमानांना होणारे अपघात हा हवाई दलासाठी चिंतेचा विषय आहे. आता एलसीए मार्क १ए, एलसीए मार्क २ या स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानांचा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समावेश करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे.