जयपूर: हवाई दलाच्या मिग-27 विमान राजस्थानच्या जैसलमेरमध्ये कोसळलं. संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हे विमान प्रशिक्षणासाठी वापरलं जात होतं. त्या दरम्यानच विमान कोसळल्याची माहिती मिळते आहे. सुदैवानं वैमानिक सुरक्षित आहे. विमान कोसळत असताना वैमानिकानं पॅराशूटच्या मदतीनं उडी घेतली. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. काही दिवसांपूर्वीच हवाई दलाचं मिराज 2000 विमान कोसळलं होतं. हवाई दलाचं मिग-27 हे लढाऊ विमान पोखरणमधल्या इटा गावात कोसळल्याची माहिती सुरक्षा दलातील अधिकाऱ्यानं दिली. वैमानिकानं विमान कोसळत असताना पॅराशूटच्या मदतीनं उडी घेतल्यानं त्याचा जीव वाचल्याचं संरक्षण विभागाचे प्रवक्ते सोम्बित घोष यांनी सांगितलं. 'दैनंदिन प्रशिक्षण सुरू असताना आज संध्याकाळी जैसलमेरमध्ये मिग-27 विमान कोसळलं. वैमानिक सुरक्षित आहे. मात्र या दुर्घटनेची चौकशी करुन त्यामागील नेमक्या कारणाचा शोध घेतला जाईल,' असं घोष म्हणाले.
हवाई दलाचं मिग-27 विमान जैसलमेरमध्ये कोसळलं; पायलट सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 7:38 PM