राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात भारतीय हवाईदलाचे दोन पायलट असलेले मिग २१ कोसळले. यामध्ये विंग कमांडर मोहित राणा आणि फ्लाइट लेफ्टिनेंट अद्वितीय बल शहीद झाले. हे दोन्ही पायलट आपत्कालीन मार्गाचा वापर करून आपला जीव वाचवू शकले असते, परंतू त्यांनी तसे केले नाही. दाटीवाटीची लोकवस्ती असलेल्या गावावर पडणारे मिग त्यांनी शिताफीने गावाबाहेरच्या शेतात पाडले.
मृत्यू जेव्हा समोर असतो तेव्हा कोणीही त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत असतो. भारतीय पायलट मिग २१ हे लढाऊ विमान घेऊन आकाशात झेपावले होते. त्यानंतर काही वेळातच विमानात समस्या आली आणि ते वेगाने खाली येऊ लागले. एअरबेसपासून ४० किमी अंतरावर असताना मिग विमानात समस्या आली.
लढाऊ विमान हवेतच असताना त्याला आग लागली. अपघात एवढा भयानक होता, की पायलट शहीद झाले. दोन्ही पायलटकडे तेव्हा आपत्कालीन एक्झिटची संधी होती, परंतू त्यांनी जर तसे केले असते तर हे लढाऊ विमान अडीज हजारांची लोकवस्ती असलेल्या गावावर जाऊन कोसळले असते. गाव वाचवायचा की जीव याचा काही सेकंदात त्यांना निर्णय घ्यायचा होता. भारत भूमीसाठी नेहमीच प्राण तळहातावर घेऊन लढणाऱ्या या पायलटांनी आपल्या जिवापेक्षा गावाची निवड केली.
विमान अनियंत्रित होते, गावावरून या विमानाने दोन घिरट्या घातल्या. गावकऱ्यांनी हे पाहिले, विमानाला आग लागलीय, आकाशात विमान गावावरून घिरट्या घालत आहे. पायलटांनी विमानाला काहीही करून गावाच्या बाहेर पाडण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यात त्यांना यशही आले. विमान पडल्यानंतर तीन किमीवर आवाज ऐकू आला. गावकऱ्यांनी विमानाच्या दिशेने धाव घेतली. तोवर उशीर झाला होता. विमानाला आगीच्या ज्वाळांनी घेरले होते. आग कमी होताच गावकऱ्यांनी पायलटांना शोधण्याचा प्रयत्न केला, तोवर दोन्ही पायलट शहीद झाले होते.
विमान पडले त्या शेतात १५ फूट खड्डा तयार झाला होता. अर्ध्या किमी भागात आगच आग दिसत होती, असे गावकऱ्यांनी सांगितले. भारतीय हवाईदलानुसार मिग विमान ट्रेनिंगच्या उड्डाणावर होते. विंग कमांडर मोहित राणा हे हिमाचल प्रदेशच्या मंडीचे होते, तर अद्वितीय बल हे जम्मूचे आहेत. राणा यांचे वडील सैन्यात मेजर होते. ते सध्या चंदीगढमध्ये राहत आहेत.