पठाणकोट : हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी सोमवारी येथील हवाई तळावरून स्वत: सारथ्य करत ‘मिग’ जातीच्या लढाऊ विमानातून अखेरचे उड्डाण केले. यावेळी त्यांच्यासोबत यंदा ‘वीरचक्र’ देऊन गौरविलेले हवाईदलाचे बहाद्दर वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हेही होते.
अभिनंदन ‘मिग’ विमानांच्या ज्या २९ व्या स्वाड्रनमध्ये आहेत त्याचा पठाणकोट हा तळ आहे. बालाकोट हल्ल्याच्या वेळीही अभिनंदन येथूनच ‘मिग’ विमान घेऊन रवाना झाले होते. ही ‘मिग’ विमान आता खूपच जुनी झाली असून त्यांचा वापर या वर्षअखेर बंद केला जायचा आहे. उड्डाण करून परतल्यानंतर धनोआ व अभिनंदन या दोघांनीही आनंद व्यक्त केला. अभिनंदन व आपल्यात बऱ्याच बाबतीत साम्य असल्याचे सांगून हवाईदलप्रमुख म्हणाले की, आम्ही दोघांनीही पाकिस्तानशी युद्ध केले व आम्हाला दोघांनाही त्या हल्ल्याच्या वेळी विमानातून उडी मारून बाहेर पडावे लागले होते.हवाईदलप्रमुख स्वत:विषयी ज्या हल्ल्याचा उल्लेख केला तो १९९९ मधील कारगिल युद्धातील होता. त्यावेळी धनोआ ‘मिग’ विमानांच्या १७ व्या स्वाड्रनचे प्रमुख होते व त्यावेळी त्यांनी याच विमानांतून बॉम्बहल्ले करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानचे रसदीचे तळ उद््ध्वस्त केले होते. अपाचे हेलिकॉप्टर आज दाखल होणारच्अमेरिकेच्या बोर्इंग कंपनीकडून घेतलेल्या ‘अपाचे एएच ६४ई’ या जगातील सर्वोत्तम अशा आठ लढाऊ हेलिकॉप्टरची पहिली तुकडी मंगळवारी पठाणकोट हवाईतळावर भारतीय हवाईदलात दाखल होणार आहे. हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल धनोआ त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. अशी एकूण २२ ‘अपाचे’ हेलिकॉप्टर खरेदी केली जायची आहेत. ही सर्व हेलिकॉप्टर पुढील दोन वर्षांत मिळतील.