कन्नौज (उत्तर प्रदेश) - देशात झालेला कोरोनाचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजूर आणि कामगारांची मोठ्या प्रमाणावर फरफट झाली आहे. हजारो मजुरांनी हजारो किलोमीटरचा पल्ला मिळेल त्या साधनाने वा पायी पार करत आपले मूळ गाव गाठले आहे. मात्र गावी गेल्यानंतरही अशा स्थलांतरितांची फरफट थांबण्याचे नाव घेत नाही आहे.उत्तर प्रदेशमध्ये परतलेल्या अशाच एका कुटुंबाकडे खाण्यासाठीसुद्धा काही नव्हते. त्यामुळे या कुटुंबाला धान्य आणि औषधे खरेदी करण्यासाठी स्वतःकडचे दागिने नाईलाजास्तव विकावे लागल्याची घटना समोर आली आहे. हे कुटुंब सुमारे तीस वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये गेले होते. तिथे कुल्फी विकून ते आपला उदरनिर्वाह चालवत होते. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने या कुटुंबाला मुळगावी परतावे लागले.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कन्नौजमधील फतेहपूर जसोदा गावातील रहिवासी असलेले श्रीराम तीस वर्षांपूर्वी कुटुंबासह तामिळनाडूमध्ये गेले होते. तिथे कुल्फी विकून ते उदरनिर्वाह करत होते. तसेच ते पत्नी आणि मुलांसह भाड्याच्या घरात राहत होते. दरम्यान, मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घरमालकाने त्यांना घर खाली करण्यास बजावले त्यानंतर ते गावी परतले.मात्र गावी परतल्यानंतर त्यांचा पुढच्या फरफटीस सुरुवात झाली. याबाबत श्रीराम यांची कन्या राजकुमारी हिने सांगितले की, येथे आल्यावर आम्हाला १० किलो तांदूळ आणि डाळ देण्यात आली. आमचे कुटुंब मोठे आहे. त्यामुळे आमच्याकडील धान्य लवकर संपले. तर माझी भावंडे आणि आई आजारी पडली. त्यामुळे धान्य आणि औषधे खरेदी करण्यासाठी आईकडील काही दागिने विकण्याशिवाय काही पर्याय नव्हता. यादरम्यान आम्ही रेशनकार्ड बनवण्यासाठी प्रयत्न देखील केला. मात्र नवीन रेशनकार्ड बनत नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले.दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशातील प्रशासन खडबडून जागे झाले. कन्नौजचे जिल्हाधिकारी राजेश मिश्रा यांनी याबाबत सांगितले की, मी ब्लॉक डेव्हलपमेंट अधिकारी आणि सप्लाय इन्स्पेक्टर यांना याबाबतचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. हे कुटुंब दोन आठवड्यांपूर्वी परतले होते. तसेच ट्रांझिस्ट कँम्पमध्ये राहत होते. त्यांची नोंदणी करून त्यांना धान्य देण्यात आले आहे. तसेच त्यांचे जॉब कार्ड बनवण्यात आले असून, त्यांचे रेशनकार्डही बनवण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशात परतलेल्या स्थलांतरित कुटुंबाचे अन्नधान्यासाठी हाल, पोट भरण्यासाठी विकावे लागले दागिने
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 5:24 PM