CoronaVirus : मजुरांना घरी पाठवण्यासंदर्भात तयार होतोय 'बिग प्लॅन', पण केंद्र सरकार घालू शकतं अशी अट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 04:25 PM2020-04-25T16:25:18+5:302020-04-25T16:45:47+5:30
लॉकडाऊनमुळे देशाच्या अनेक भागांत स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. त्यांची कुठल्याही परिस्थितीत आपल्या घरी जाण्याची इच्छा आहे. यामुळे आता खुद्द केंद्र सरकारच या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासंदर्भात प्लॅन तयार करत आहे.
नवी दिल्ली : सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याला भारतही अपवाद नाही. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे देशाच्या अनेक भागांत स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. त्यांची कुठल्याही परिस्थितीत आपल्या घरी जाण्याची इच्छा आहे. यामुळे आता खुद्द केंद्र सरकारच या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासंदर्भात प्लॅन तयार करत आहे. त्यामुळे आशा व्यक्त केली जात आहे, की हे सर्वजण लॉकडाऊन उघडताच त्यांच्या घरी पोहोचतील.
तयार होतोय 'बिग प्लॅन' -
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील या मजुरांना त्यांच्या घरी पाठविण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये चर्चा सुरू आहे. असेही समजते, की उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यांनी या मजुरांना घरी परत आणण्यासाठी यापूर्वीच तयारी दर्शवली आहे. मात्र, या मजुरांना सरळ त्यांच्या घरी पाठवले जाणार नाही. सांगण्यात येते, की आपल्या राज्यात पोहोचल्यानंतर त्यांना एका विशिष्ट ठिकाणी क्वारंटाइन करण्यात येईल. यानंतरच त्यांना आपापल्या गावी पाठवले जाईल. यापूर्वी, लॉकडाऊन लागू झाल्यानंतर हजारो मजूर आपापल्या घरी जाण्याच्या आशेने दिल्ली आणि मुंबईतील रेल्वेस्थानकांवरही एकत्र आले होते.
शिवराज सिंह चौहानांनी घेतला निर्णय -
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांना काही निर्देशही दिले आहेत. मुख्यमंत्री शिवराज संह यांच्या नुसार, जे मजूर राज्याच्या बाहेर लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत त्यांना परत आणण्यात येईल. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांशीही फोनवरून संपर्क साधला आहे. मध्य प्रदेश सरकार मजुरांना परत आणण्यासाठी आपल्या पातळीवर पूर्णपणे प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर राज्यात विविध जिल्ह्यांत अडकलेल्या मजुरांनाही त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
रेल्वेमंत्र्यांना पत्र -
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी, या मजुरांना मदतीचा हात देण्यासंदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहिले होते. यात, लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालू व्हाव्यात. या गाड्या पुणे आणि मुंबईहून चालवण्यात याव्यात, अशी विनंती अजित पवार यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली होती.