जयपूर - राजस्थानच्या जयपूरमध्ये असलेल्या सांभर तलावात हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या आठ दिवसांत जवळपास 17,000 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. या भागात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. काही स्थलांतरीत पक्षीही दरवर्षी सांभार तलावात येत असतात. मात्र आता पक्ष्यांचा मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
जयपूरचे जिल्हा कलेक्टर जगरूप सिंह यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांभर तलावात हजारो पक्षी येत असतात. मात्र पक्षांचा मृत्यू झाला आहे. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी वन विभागाला तातडीने माहिती दिली. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. सर्व मृत पक्षी वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करून हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. अशा घटना रोखण्यासाठी सरकार कठोर पावलं उचलत असल्याचं देखील गहलोत यांनी म्हटलं आहे.
हिमालय, सायबेरिया, उत्तर आशियासह अन्य देशांमधून आलेल्या पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 17,000 हजार पक्ष्यांचा मृत्यू झालाचा दावा स्थानिक लोकांनी केला आहे. नॉदर्न शावलर, पिनटेल, कॉनम टील, रूडी शेल डक, कॉमन कूट गेडवाल, रफ, ब्लैक हेडड गल, ग्रीन बी ईटर, ब्लॅक शेल्डर काइट, कॅसपियन गल, ब्लॅक विंग्ड स्टील्ट, सेंड पाइपर, मार्श सेंड पाइपर, कॉमस सेंड पाइपर, वुड सेंड पाइपर पाइड ऐबोसिट, केंटिस प्लोवर, लिटिल रिंग्स प्लोवर, लेसर सेंड प्लोवर या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हजारो पक्ष्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झालेला नाही. तर सांभर तलावाच्या पाण्यात विषारी पदार्थ मिसळल्याने पक्ष्यांचा मृत्यू झाला असावा असे प्राथमिक तपासातून समोर येत असल्याची माहिती पक्ष्यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या टीममधील एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक हे जयपूरमधील सांभर तलावाजवळ स्थलांतरीत पक्षी पाहण्यासाठी येत असतात. लाखो पक्षी या तलावावर येत असतात. यामध्ये जवळपास 50 हजार फ्लेमिंगो आणि 1 लाख वेडर्स असतात.