नवी दिल्ली - दिल्लीतील रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे केजरीवाल आता काँग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांच्यानंतर तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे दुसरे नेते ठरले आहे. यावरून अनेक नेत्यांनी केजरीवालांचे कौतुक केले आहे. मात्र केजरावीलांचे कौतुक केल्यामुळे काँग्रेसमधील नेते ट्विटरवर एकमेकांना भिडले आहेत.
काँग्रेस नेते मिलींद देवरा यांनी रविवारी रात्री उशीरा केजरीवाल यांचे कौतुक करणारा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. यानंतर वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे दिल्लीतील नेते अजय माकन यांनी मिलींद देवरा यांच्यावर टीका केली आहे. तसेच तुम्हाला काँग्रेस पक्ष सोडायचा असेल तर खुशाल सोडा, असा सल्लाही अजय माकन यांनी देवरा यांना दिला आहे.
मिलींद देवरा यांनी अरविंद केजरीवाल यांचा व्हिडिओ शेअर करून त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. अरविंद केजरीवाल यांनी सरकारी निधी दुप्पट करून दाखवाल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे दिल्ली आता आर्थिक क्षेत्रात सक्षम होत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
मिलींद देवरा यांच्या ट्विटनंतर अजय माकन यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली. तसेच आकडेवारी देखील समोर केली. माकन यांच्या व्यतिरिक्त काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी देखील मिलींद देवरा यांच्यावर कडाडून टीका केली आहे. वडिलांच्या नावावर पक्षात यायच आणि पहिल्याच निवडणुकीत केंद्रीयमंत्री व्हायच. पण लढण्याची वेळ आली की पदासाठी भांडत बसायच आणि सत्ताधाऱ्यांच कौतुक करायचं, असा टोला लांबा यांनी देवरा यांना लगावला आहे.