ऑनलाइन लोकमत
दीपहू, दि. २३ - आसामच्या करबी अँगलाँग जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सकाळी लष्कर आणि करबी पीपल्स लिबरेशन टायगर्सच्या दहशताद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत लष्कराने केपीएलटीच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. केपीएलटीचे दोन मोहरकेही या चकमकीत मारले गेले.
चकमकी दरम्यान लष्कराचा एक जवान जखमी झाला. मिळालेल्या विशेष माहितीच्या आधारावर बानीपठारच्या जंगलात लष्कर आणि पोलिसांनी रात्री एकच्या सुमारास संयुक्त कारवाई सुरु केली. दहशतवाद्यांनी गोळीबार करताच जवानांनीही प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात सहा दहशतवादी ठार झाले. मारले गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये केएलपीटीचे दोन मोहोरके आहे. मृत दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एक एसएलआर रायफल, इनसास रायफल, तीन पिस्तुल आणि दोन ग्रेनेड घटनास्थळी सापडले. केएलएनएफने शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर त्यातून फुटून २०१०-११ मध्ये केएलपीटीची स्थापना झाली होती. बोकाजानच्या दुर्गम भागामध्ये या संघटनेच्या अतिरेकी कारवाया सुरु होत्या.