श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत वाढ झाली असून, रविवारी सुंदरबनी परिसरात पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताच्या तीन जवानांना वीरमरण आले होते. दरम्यान, नियंत्रण रेषेपलीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा लाँचिंग पॅड उभे केले असून, तेथे मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांची जमवाजमव होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पाकिस्तानचे हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्कर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करण्याची शक्यता आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी गोळा झाले असून, याठिकाणी पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने 60 ते 70 दहशतवाद्यांची जमवाजमव केली आहे. या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराकडून पुरेपूर मदत देण्यात येत आहे. हे सर्व दहशतवादी लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांची जमवाजमव झालेले लाँच पॅड हे भारताच्या तंगधार आणि उरी विभागांच्या थेट समोर आहेत. याच भागात मुजाहिद्दीन बटालियनची तैनाती करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. त्याद्वारे या भागातील भारतीय जवानांवर हल्ले वाढवण्याची घातक योजना पाकिस्तानने आखली आहे. रविवारी पाकिस्तानच्या BAT च्या पथकाने भारतीय जवानांवर हल्ला केला होता. यात भारताच्या तीन जवानांना वीरमरण आले होते.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांची जमवाजमव, लष्कर सर्जिकल स्ट्राइकच्या तयारीत?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 5:09 PM