इंफाळ: गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार अजून पूर्णपणे शांत झालेला नाही. मंगळवारी(दि.31) कथित कुकी हल्लेखोरांनी सुरक्षा दलावर अचानक हल्ला केला. तेंगनौपाल येथे मंगळवारी सकाळी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर पोलीस कमांडोचे पथक घटनास्थळाकडे जात असताना वाटेतच बंडखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात काही कमांडो जखमी झाले.
रिपोर्टनुसार, चिंगथम आनंद नावाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भारत-म्यानमार सीमेवरील तेंगनौपालच्या मोरेह शहरात हेलिपॅडच्या बांधकामाची पाहणी करत असताना हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. घटनास्थळ राजधानी इंफाळपासून 115 किमी अंतरावर आहे. मैदानी भागातील महामार्गासाठी हे अंतर जास्त नाही, परंतु इम्फाळ-मोर मार्गावर अनेक टेकड्या, जंगले आणि हेअरपिन वळणे आहेत, ज्यामुळे अशाप्रकारच्या हल्ल्यांचा धोका वाढतो. हल्लेखोराला ठार करण्यासाठी मणिपूर पोलिसांनी मोरेह येथे कमांडो दल पाठवले होते. यावेळी या दलावरही अचानक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात काही जवान जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आसाम रायफल्सच्या जवानांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
3 मेच्या हिंसाचारापासून मणिपूर पोलिस कमांडोंचे एक छोटे पथक मोरेहमध्ये तैनात आहे, जे मजबूत केले जात आहे. मात्र, बंडखोर रस्ते मार्गावर सातत्याने हल्ले करत असल्यामुळे बीएसएफ आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सीमावर्ती शहरात पाठवणे सोपे नाही. त्यामुळेच मोरेहमध्ये नवीन हेलिपॅड बांधले जात आहे. मोरेहमधील हे तिसरे हेलिपॅड असेल, इतर दोन हेलिपॅड आसाम रायफल्सच्या अंतर्गत आहेत, ज्यांचे ऑपरेशनल नियंत्रण लष्कराकडे आहे.