श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा पथकांमध्ये चकमक सुरु आहे. एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा पथकांना यश आलं आहे. रविवार पहाटेपासून ही चकमक सुरु आहे. या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले सर्व जवान सुरक्षित आहेत. हंदवाडाच्या हाजीन भागात ही चकमक सुरु आहे. अजून दोन ते तीन दहशतवादी या ठिकाणी लपून बसल्याचा सुरक्षा पथकांना संशय आहे.
दहशतवादी लपलेल्या भागाला चहूबाजूंनी घेराव घातला असून मोठया प्रमाणावर शोधमोहिम सुरु आहे. पुलावामातील त्रालमध्ये पीडीपी नेते मोहम्मद अश्रफ पीर यांच्या घरावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर काही तासांनी ही चकमक सुरु झाली. काश्मीरमध्ये याआधी सुद्धा अनेक नेत्यांच्या घरावर हल्ले झाले आहेत. मे महिन्यात दहशतवाद्यांनी पीडीपीचे पुलवामाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल गनी दार यांची हत्या केली होती.
काश्मिरात अतिरेकी हताश होत आहेतकाश्मीरमधील परिस्थिती सुधारत आहे आणि तेथे सध्या दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे हताश झाल्याचे चित्र दिसत आहे, असे ठाम प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी शनिवारी येथे केले. लष्कराच्या ४७ व्या चिलखती रेजिमेंटला राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान केल्यानंतर जवानांसमोर बोलताना जनरल रावत म्हणाले की, लष्कराने ‘सदभावना शिबिरे’ आयोजित करणे सुरू केल्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. अनेक तरुण दहशतवाद्यांच्या विखारी प्रचाराला बळी न पडता लष्करात व पोलिसांत भरती होण्यासाठी पुढे येत आहेत.
मात्र दहशतवादविरोधी लढ्यात चढ-उतार होतच राहतात, असे नमूद करून ते म्हणाले की, दहशतवाद्यांतर्फे समाजमाध्यमांतून चालविल्या जाणाºया मोहिमांना काही चुकार युवक बळी पडतात पण त्यांचा आम्ही बंदोबस्त करतो. पण मार्ग चुकलेले अनेक तरुण शरणागती पत्करून सुरक्षा दले आणि पोलिसांच्या स्वत:हून स्वाधीन होत आहेत.
विखारी धार्मिक प्रचाराने माथी भडकावणे हा प्रकार केवळ भारतातच नव्हे तर जगभर सर्वत्र सुरू आहे व ती एक गंभीर चिंतेची बाब आहे, हे मान्य करून ते म्हणाले की, नागरी प्रशासन व सुरक्षा दले हा प्रश्न निकडीने हाताळत आहेत. काश्मीर खो-यात महिलांच्या वेण्या कापण्याचे अनेक प्रकार वारंवार घडत आहेत. लष्कर त्याकडे एक आव्हान म्हणून पाहते का, असे पत्रकारांनी विचारता जनरल रावत म्हणाले की, यास तुम्ही आव्हान का म्हणता कळत नाही. असे प्रकार देशाच्या इतर भागांतही घडले आहेत. त्यांचाही योग्य बंदोबस्त केला जाईल.