श्रीनगर- दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी नापाक कृत्य केलं आहे. पुलवाम्यातील पिंगलान भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली, या चकमकीत एका मेजरसह चार जवानांना वीरमरण आलं. तर एक जण जखमी आहे. सध्या तरी दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू आहे. एका घरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसले असून, ते तिथूनच गोळीबार करत असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी पहाटे सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली असता लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबारात पाच जवानांना वीरमरण आलं. एक जवान जखमी झाला आहे. शहीद झालेल्या चार जवानांमध्ये मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले असून अजूनही चकमक सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार हे दहशतवादी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चकमकीत एक नागरिकही जखमी झाल्याचे समजते. पुलवाम्यात 14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका बसवर हल्ला केला होता. त्यात आपले 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली होती. त्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी जोरदार सर्च ऑपरेशन राबवलं असून, याचदरम्यान दोन ते तीन दहशतवादी पिंगलान येथे लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. जवानांनी परिसराला चारही बाजूंनी घेरलं असून, दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू आहे.
पुलवामात दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत एका मेजरसह चार जवानांना वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 7:50 AM