श्रीनगर: करणनगर येथील भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांकडे खाण्याचे पदार्थ किंवा औषधं न सापडणं, ही आश्चर्याची बाब असल्याचे मत भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. तब्बल 30 तास सुरू असलेल्या चकमकीनंतर भारतीय जवानांनी इमारतीत लपलेल्या २ अतिरेक्यांना ठार केले. मात्र, इतका दीर्घकाळ एखाद्या ठिकाणी ठाण मांडून बसायचे असेल तर दहशतवाद्यांकडे अन्नाचा साठा आणि औषधे असणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्याकडील बॅग्समध्ये अशा कोणत्याही वस्तू सापडल्या नसल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही चकमक संपल्यानंतर भारतीय जवानांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. त्यावेळी दहशतवाद्यांच्या मृतदेहांशेजारी दोन एके-47 रायफल्स आणि आठ काडतुसं मिळाली. मात्र, त्यांच्या बॅगेत कोणतेही खाण्याचे पदार्थ किंवा औषधे मिळाली नाहीत.या दोन दहशतवाद्यांपैकी एकजण पाकिस्तानी असण्याची शक्यता आहे. मात्र, अन्य गोष्टींची अजूनपर्यंत पुष्टी होऊ शकलेली नाही. हे दोघेही लष्कर-ए-तोयबाचे हस्तक असल्याची माहिती सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक रविदीप साही यांनी दिली. दहशतवाद्यांकडे खाण्याचे पदार्थ किंवा औषधे न सापडणे ही थोडीशी विचित्र गोष्ट आहे. कारण, एखाद्या ठिकाणी बराच काळ ठाण मांडून बसायचे असेल तर दहशतवादी शक्यतो स्वत:जवळ खाण्याचे पदार्थ किंवा औषध बाळगतात. मात्र, असा प्रकार घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, असेही लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले. अतिरेक्यांनी श्रीनगरमध्ये सोमवारी सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. सुरक्षा दलाने तो उधळल्यानंतर अतिरेकी जवळच्या इमारतीत लपले होते. सुरक्षा दल व अतिरेक्यांत मंगळवारी सकाळी पुन्हा सुरू झाली. त्यात दोन्ही अतिरेकी मारले गेले. मात्र, हा नागरी वस्तीचा परिसर असल्यामुळे दहशतवाद्यांना मारण्यासाठी 30 तास लागले. दहशतवादी लपून बसलेल्या इमारतींना रहिवाशी इमारती खेटून असल्याने सैन्याला स्फोटकांचा किंवा जास्त क्षमतेच्या शस्त्रांचा वापर करता आला नाही.
'अन्न आणि औषधांशिवाय दहशतवाद्यांनी 30 तास दबा धरून बसणे आश्चर्यकारक'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 9:20 AM