- शशिकांत पित्रे
भारत काही ना काही ठोस कारवाई पाकिस्तान संदर्भात करेल हे भाकीत मी यापूर्वीच केलेले होते. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे आटोपशीर परंतु नेमकेपणाने केलेली काटेकोर कारवाई. समजा एखादे बोट दुखत असेल तर ते बोटच काढून टाकणे अशा स्वरुपाचा ढोबळ अर्थ त्यामध्ये अभिप्रेत असतो. अतिशय वेगाने कारवाई करून ती संपवणे अशा स्वरुपात हालचाली यात केल्या जात असतात. क्विक स्ट्राईक या स्वरुपात कारवाई केली जाते. आपल्याला अभ्यास करून माहित झालेले जे उद्दिष्ट असते तिथे जाऊन थोडक्यात परत येतात. गेल्या पंधरा दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे. दिनांक १८ सप्टेंबर रोजी उरीमध्ये घटना घडल्यानंतर संबंधितांना शिक्षा करू अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. डिप्लोमॅटीकली खूप पर्याय उपलब्ध होते. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली. सार्कमधून बाहेर पडणे, इंडस वॉटर ट्रीटी संदर्भातील भूमिका हा त्याचाच भाग होता. चीन सोडून अन्य सर्वांनी आपल्या भूमिकेला पाठिंबा दला आहे. यापूर्वीच आपल्या संरक्षणमंत्र्यांनी प्रत्युत्तर देण्याची वेळ, जागा आणि किती प्रमाणात हे आम्ही ठरवू असे स्पष्ट केलेले होते. याचाच अर्थ थेट युद्ध करणार नाही असाही होता. भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेले असले तरीही पाकिस्तानकडून लगेच अणुबॉम्बचा वापर होणार नाही. तसा लगेच करण्याचा इतका पाकिस्तान मूर्ख नाही. सर्जिकल स्ट्राईकमध्ये आपण जर ३५ दहशतवादी मारलेले असतील तर खरोखर आपल्याला जे साध्य करायचे होते ते आपण केले आहे असे म्हणावे लागेल. प्रसंगानुरुप थेट कारवाई करण्याचे अनेक प्लॅन आपल्या संरक्षणदलाकडे तयार असतातच. परंतु त्यासाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती यापूर्वी कधीही दाखवली गेली नव्हती ती यावेळी दाखवली गेली ही खरोखर चांगली बाब आहे. पाकिस्तानमध्ये मारले गेलेले सर्व दहशतवादी असतील तर पाकिस्तानने ओरडण्याचे काही कारण नाही. यापूर्वीही आपण त्यांना यासंबंधातील अनेक पुरावे दिलेले आहेत परंतु झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे अवघड असते. पाकिस्तानमधील दहशतवादी या घटनेनंतर देशात पुन्हा कुठेतरी हल्ला करण्याची शक्यता आहे परंतु यावेळी ते तितकेसे सोपे असणार नाही. भारताच्या कारवाईनंतर लगेच काही युद्ध होईल अशी शक्यता वाटत नाही कारण या संदर्भातील तणाव टप्प्याटप्प्याने वाढवत नेला जातो. एकदम युद्ध होत नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाचे पाठबळ ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची व जमेची बाजू आहे. भारताला जर युद्ध करायचे असेल तर आपल्याला किमान ६ महिन्यांचा कालावधी तयारीसाठी लागेल परंतु पाकिस्तानने युद्ध लादलेच तर आपण सज्ज आहोत.
(लेखक निवृत्त मेजर जनरल आहेत.)