Milk: कर्नाटकी ‘नंदिनी’ विरुद्ध केरळात उसळला असंतोष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 09:28 AM2023-04-16T09:28:39+5:302023-04-16T09:29:18+5:30
Milk: गुजरातचा प्रसिद्ध दूध ब्रँड ‘अमूल’च्या कर्नाटकातील विक्रीस विरोध होत असतानाच आता खुद्द कर्नाटकाच्या ‘नंदिनी’ दूध ब्रँडच्या केरळातील प्रवेशावरून नवा संघर्ष उफाळला आहे.
तिरुवनंतपुरम : गुजरातचा प्रसिद्ध दूध ब्रँड ‘अमूल’च्या कर्नाटकातील विक्रीस विरोध होत असतानाच आता खुद्द कर्नाटकाच्या ‘नंदिनी’ दूध ब्रँडच्या केरळातील प्रवेशावरून नवा संघर्ष उफाळला आहे. केरळात ‘मिल्मा’ नावाचा दूध ब्रँड चालविणाऱ्या ‘केरळ सहकारी दूध विपणन महासंघा’ने (केसीएमएमएफ) ‘नंदिनी’ला तीव्र विरोध केला आहे.
कर्नाटक दूध महासंघाने अलीकडेच केरळात नंदिनी ब्रँड पाठवून काही दूध विक्री केंद्रे सुरू केली आहेत. संपूर्ण केरळात फ्रंचाईजी देऊन विक्री केंद्रांचे जाळे उभे करण्याची योजनाही कर्नाटक दूध महासंघाने जाहीर केली आहे. त्यास केरळ दूध महासंघाने तीव्र विरोध केला आहे. केरळातील दूध महासंघाचे १५ लाख शेतकरी सदस्य असून ३ हजार सहकारी डेअरी त्यांच्या अंतर्गत काम करतात.
मिल्माचे चेअरमन के. एस. मणी यांनी सांगितले की, अमूल दूधाच्या कर्नाटकातील विक्रीस कर्नाटक दूध महासंघाचे हितधारक विरोध करतात. हाच महासंघ आपली उत्पादने केरळात कशी काय विकू शकतो? हे अनैतिक आहे. देशातील सहकारी डेअरी चळवळीच्या मूलभूत उद्देशाचा पराभव करणारे आहे. (वृत्तसंस्था)