मुंबई: काही दिवसांपूर्वीच जवळपास सर्वच दूध विक्रेत्या कंपन्यांनी दुधाच्या दरात वाढ केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ होणार आहे. दुधाच्या दरात प्रति लिटर ४ ते ५ रुपयांची, तर दुग्धजन्य पदार्थ्यांच्या दरात ८ ते १० रुपयांची वाढ अपेक्षित असल्याचं अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोढी यांनी सीएनबीसी टीव्ही-१८ शी बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे लवकरच दुधाचे दर वाढू शकतात. दूध पुरवठा करण्याची क्षमता जास्त असलेल्या कंपन्यांना यंदा मोठा फायदा होईल, असा अंदाज सोढी यांनी वर्तवला. 'दूध उत्पादक कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये दोनदा दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न २०१८ च्या तुलनेत २० ते २५ टक्क्यांनी वाढलं आहे,' असं सोढी म्हणाले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात दूध उद्योगासाठी बऱ्याच चांगल्या तरतुदी केल्याचं सोढी यांनी सांगितलं. सध्या देशात ५३.५ मेट्रिक टन दुधावर प्रक्रिया होते. २०२५ पर्यंत हाच आकडा १०८ मिलियन मेट्रिक टनवर नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. यासाठी ४० ते ५० हजार कोटींची गुंतवणूक आवश्यक असल्याचं सोढी म्हणाले. दुधासह आणखी अनेक उत्पादनांना एका ठिकाणाहून सहजपणे दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक विशेष प्रकल्पांची घोषणा केली. रेल्वे आणि नागरी उड्डाण मंत्रालय अनुक्रमे कृषी उडाण आणि किसान रेल या प्रकल्पांवर काम करणार आहेत. यामुळे दूध आणि शेती उद्योगाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महागाईत आणखी भर; लवकरच 'इतक्या' रुपयांनी वाढणार दुधाचे दर?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 9:00 PM