बंगळुरू, दि. 8 - पत्रकार गौरी लंकेश यांच्या झालेल्या निर्घृण हत्येनंतर देशभरात संतापाची लाट उसळलेली आहे. हत्येला चार दिवस उलटले तरी त्यांच्या खुन्यांचा सुगावा पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे आता लंकेश यांच्या हत्येबाबत तसेच त्यांच्या खुन्यांविषयी माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री रामालिंगा रेड्डी यांनी गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यांस बक्षीस देण्याची घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची वेगाने चौकशी करून आरोपींनी लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. लंकेश यांच्या हत्येसंबंधी माहिती देण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी दूरध्वनी क्रमांक आणि इमेल प्रसिद्ध केले होते. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी शुक्रवारी लंकेश यांच्या हत्येच्या तपासाचा आढावा घेतला. त्यावेळी एसआयटीचे प्रमुख बी. के. सिंह, राज्याचे डीजीपी आर. के. दत्ता उपस्थित होते. या बैठकीनंतर लंकेश यांच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली. प्रख्यात पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. 55 वर्षीय गौरी लंकेश या ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. मंगळवारी गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गौरी लंकेश आपली गाडी पार्क करुन घराच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. गौरी लंकेश यांनी दरवाजाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला असता, तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यापैकी एक गोळी मानेवर, एक छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली. तर चार गोळ्या घराच्या भिंतीवर लागल्या. ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक 'लंकेश पत्रिका'च्या संपादक गौरी लंकेश यांना कदाचित एक आठवडाआधीच आपल्यावर होणा-या हल्ल्याची चाहूल लागली होती. त्यांनी यासंबंधी आपल्या आई आणि बहिणीसोबत चर्चाही केली होती. गेल्या काही दिवसांपासून आपल्या घराजवळ काही लोक संशयास्पदपणे वावरत आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र गौरी लंकेश यांनी यासंबंधी पोलिसांकडे कोणतीही तक्रार किंवा माहिती दिली नव्हती. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनीदेखील गौरी लंकेश यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा कधीही उल्लेख केला नसल्याचं सांगितलं आहे. 'त्या नेहमी मोठ्या अधिका-यांना भेटत असत, पण त्यांच्याकडेही कधी त्यांनी आपल्याला धोका असल्याची तक्रार केली नव्हती', असं त्यांनी सांगितलं. गौरी यांच्या बहिण कविता लंकेश यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं आहे की, 'एका आठवड्याभरापुर्वी गौरी बानाशंकरी येथे आपल्या आजारी आईची भेट घेण्यासाठी आली होती. त्यावेळी गौरी आपल्या सुरक्षेवरुन चिंतित होती. आपल्या घऱाजवळ काही लोक संशयास्पद हालचाली करत असल्याचं तिने सांगितलं होतं. मी आणि आईने तिला पोलिसांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला होता. पण गौरीने पुढच्या वेळी असे लोक दिसले तर नक्की तक्रार करेन असं सांगितलं'.
पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यांस दहा लाख रुपयांचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2017 8:10 PM