कानपूर : बिल गेट्स किंवा मुकेश अंबानी यांच्यापेक्षाही अधिक पैसे तुमच्या बँकेच्या खात्यात अचानक आले तर तुम्हाला नक्कीच हर्षवायू होईल किंवा चक्रावून जाल. असाच अनुभव कानपूरमध्ये मोलकरणीचे काम करणाऱ्या उर्मिला नावाच्या महिलेला आला. स्टेट बँकेतील तिच्या खात्यामध्ये अचानक ९५,७१,१६,९८,६४७.१४ इतके रुपये जमा झाल्याचे समजल्यावर तिला आश्चर्याचा धक्काच बसला.ऊर्मिलाने जन धन योजनेचा लाभ घेत कानपूरच्या विकासनगर शाखेमध्ये २ रुपये भरून खाते सुरू केले होते. काही दिवसांपूर्वी तिला अचानक ९ लाख ९९ हजार ९९९ रुपये खात्यात जमा झाल्याचा आणि नंतर ९ लाख ९७ हजार काढून घेतल्याचा संदेश आला.या संदेशामुळे चक्रावून गेलेल्या ऊर्मिलाने खाते काढण्यास मदत करणाऱ्या ललिता तिवारीसह सरळ शाखा गाठली आणि ही माहिती दिली. पण खरा धक्का तर तिला नंतरच बसायचा होता. तिच्या माहितीनुसार, जेव्हा खात्याची तपासणी केली तेव्हा केवळ १० लाख नाही, तर ९५,७१,१६,९८,६४७.१४ एवढी रक्कम जमा झाल्याचे दिसून आले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही ही रक्कम उच्चारता आली नाही. हा सगळा प्रकार पुरेशी रक्कम खात्यात नसल्याने खाते गोठविण्याच्या प्रक्रियेमुळे झाला असावा, असे मत बँकेतील वरिष्ठ कारकून व्ही.के. श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. तर खातेदाराच्या परवानगीशिवाय कोणतेही व्यवहार बँकेला करता येत नाहीत, असे सनदी लेखापाल अभिषेक गुप्ता यांनी सांगितले; आणि याबाबत अधिक तपास होण्याची गरजही व्यक्त केली. हे सगळे असले तरी ऊर्मिलाला मायक्रोसॉफ्टची स्थापना करणाऱ्या बिल गेट्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज्चे मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त पैसे काही काळ खात्यात असल्याचा आनंद मात्र घेता आला हे खरे. (वृत्तसंस्था)
बिल गेट्सपेक्षा मोलकरीण श्रीमंत!!
By admin | Published: July 26, 2015 4:13 AM