'गेल्या 3 वर्षात हजारो करोडपती भारतीयांनी देश सोडला', काँग्रेसचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 08:25 PM2024-06-21T20:25:34+5:302024-06-21T20:25:57+5:30
Millionaires Leaving India: करोडपतींच्या स्थलांतराच्या बाबतीत चीन आणि ब्रिटेननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Millionaires Leaving India : दरवर्षी शेकडो/हजारो भारतीय परदेशात स्थलांतरित होतात. आता याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी सांगितले की, "2022 मध्ये 2 लाख 26 हजार भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडले आहे. हा आकडा 2011 मधील 1 लाख 23 हजार पेक्षा दुप्पट आहे."
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आरोप केला की, "एका जागतिक गुंतवणूक स्थलांतर सल्लागार फर्मने खुलासा केलाय की, गेल्या तीन वर्षांत 17,000 हून अधिक करोडपती भारतीयांनी देश सोडला आहे. या लोकांची एकूण संपत्ती दहा लाख डॉलर्सपेक्षा जास्त आहे. याचे कारण म्हणजे भारतीय कॉर्पोरेट्स देशातील कर धोरण आणि मनमानी करांमुळे गेल्या 10 वर्षांपासून भीतीचा सामना करत आहेत."
By the Govt's own data revealed in Parliament 226,000 Indians gave up their citizenship in 2022, almost double the 123,000 who did so in 2011.
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) June 21, 2024
Now a leading global investment migration advisory firm has revealed that over 17,000 millionaires--individuals with total assets…
"भारतातील मोठ-मोठे उद्योगपती देश सोडून सिंगापूर, यूएई, ब्रिटनसह इतर ठिकाणी स्थायिक होत आहेत. अशा प्रकारचे स्थलांतर ही चिंतेची बाब आहे," अशी टीका त्यांनी केली.
स्थलांतराच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर
आंतरराष्ट्रीय गुंतवणूक स्थलांतर सल्लागार फर्म Henley & Partners च्या अहवालानुसार, 2024 मध्ये 4,300 करोडपती भारतीय देश सोडून जातील आणि हे लोक UAE मध्ये स्थायिक होऊ शकतात. करोडपतींच्या स्थलांतराच्या बाबतीत भारत, चीन आणि ब्रिटननंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.