एमआयएमचे प्रमुख (AIMIM) असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन आता अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ओवेसी यांनी त्यावर स्पष्टीकरण देत त्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
"तुम्ही लक्षात ठेवा. काय योगी मुख्यमंत्री राहणार नाहीत, मोदी कायम पंतप्रधान राहणार नाही. प्रत्येक मुस्लीम व्यक्ती सध्या शांत आहे, परंतु विसरणार नाही. आम्ही लक्षात ठेवू... परिस्थिती बदलेल. जेव्हा योगी मठात जातील, मोदी हिमालयात जातील, तेव्हा तुम्हाला वाचवायला कोण येईल," असं ओवेसी म्हणताना दिसत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
ओवेसी यांनी २ मिनिट १५ सेकंदाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. "मी आपल्या भाषणादरम्यान हिंसाचारासाठी उकसवलं नाही किंवा धमकीही दिली नाही. मी आपल्या भाषणात पोलिसांच्या अत्याचारावर भाष्य केलं आहे. माझा व्हिडीओ काटछाट करुन दाखवण्यात आला आहे.," असंही ते म्हणाले. माझ्या बोलण्याचा उद्देश स्पष्ट आहे. जे शांतपणे तमाशा पाहतात, कारण गर्दीमध्ये एका रिक्षाचालकाला त्याच्या मुलीसमोर मारहाण केली जाते. मी त्या पोलिसांबद्दल बोललो जे मुलागा हाती असलेल्या व्यक्तीवर लाठ्यांचा वर्षाव करतात, असंही ओवेसींनी स्पष्ट केलं.