मुंबई: भाजपा आणि एमआयएम एकच पक्ष असून भाजपाकडून एमआयएमला पैसा पुरवला जात असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यावर हैदराबादवरुन आलेल्या लोकांची चिंता करत असतील तर ममता दीदी भाजपाने लोकसभेच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमधील 42 जागांपैकी 18 जागा कशा काय जिंकल्या असा प्रश्न उपस्थित करत एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन औवैसी यांनी ममता बॅनर्जींच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे.
असदुद्दीन म्हणाले की, एमआयएमवर आरोप करुन ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिले की एमआयएम पक्ष राज्यात सर्वात शक्तीशाली पक्ष बनला आहे. तसेच या आरोपावरुन ममचा दीदींना वाटणारी भीती दिसून येत आहे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये मुस्लीमांना मुलभूत सुविधाचं उपलब्ध होत नसल्याने यावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे धार्मिक कट्टरता नसल्याचे देखील असदुद्दीन औवैसी यांनी सांगितले.
बंगालमध्ये 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी भाजपासह असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएम पक्षावर गंभीर आरोप केले होते. अल्पसंख्यांक समाजाने असदुद्दीन ओवेसींसारख्यांवर विश्वास ठेवू नये, असे म्हणत ममता यांनी एमआयएम ही भाजपाची बी टीम असल्याचं सूचवलंय. ओवेसी यांचे नाव न घेता ममता यांनी त्यांच्यावर टीका केली. हैदराबादवरून इकडे येऊन ते सभा घेतात. येथे येऊन अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेचा दावा करतात. पण, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे म्हणत अल्पसंख्यांक समाजाला आपल्यासोबत राहण्याचे आवाहन त्यांनी केले होते.