लखनऊ:उत्तर प्रदेशात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. विविध ठिकाणी पक्षांचे दौरे, सभा होत आहेत. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवैसीदेखील आजपासून तीन दिवसांच्या यूपी दौऱ्यावर आहेत. पण, त्यांचा हा दौरा आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
असदुद्दीन औवैसी यांना उत्तर प्रदेशात पहिल्याच दिवशी प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला आहे. त्याला कारणही तसेच आहे. औवैसी यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर अयोध्या शहराचा फैजाबाद असा उल्लेख करण्यात आला आहे. हे पोस्टर काही दिवसांपूर्वीच जारी करण्यात आले होते. पोस्टर समोर येताच संत समाज आणि मुस्लिम समाजातील काही जुन्या लोकांनी औवैसींच्या दौऱ्यावर बंदी घालण्याची मागणी केली. वाद वाढताच, एमआयएमला पोस्टर काढून टाकण्यास सांगितले गेले, पण आताही हे पोस्टर एआयएमआयएमच्या ट्विटर हँडलवर ट्वीट करण्यात आले आहे.
औवैसी यांचा दौरा
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवैसी आज (7 सप्टेंबर) अयोध्या येथून त्यांच्या तीन दिवसीय दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. ते आज अयोध्येच्या रुदौली शहरात वंचित शोषित संमेलनाला संबोधित करतील. यानंतर असदुद्दीन ओवेसी 8 सप्टेंबर रोजी सुलतानपूरला जातील. ओवैसी यूपी दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 9 सप्टेंबरला बाराबंकीला जातील.