हैदराबाद: आमचा गळा कापलात, तरीही आम्ही मुस्लिमच राहू. आम्ही तुम्हाला मुस्लिम करुन दाढी ठेवायला लावू, असं वादग्रस्त विधान एमआयएमचे अध्यक्ष असदुद्नीन ओवेसी यांनी केलं आहे. हरयाणात काही दिवसांपूर्वी एका मुस्लिम व्यक्तीची दाढी जबरदस्तीनं कापण्यात आली. या घटनेचा निषेध करताना ओवेसी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. हरयाणामध्ये ज्यांनी हे (मुस्लिम व्यक्तीची जबरदस्तीनं दाढी कापली) कृत्य केलं आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही शेवटपर्यंत मुस्लिमच राहू. आमचा गळा कापलात, तरी आम्ही मुस्लिमच असू, असं ओवेसी म्हणाले. आम्ही तुम्हाला मुस्लिम करुन तुम्हाला दाढी ठेवायला भाग पाडू, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. गेल्या आठवड्यात गुरुवारी हरयाणाच्या गुरुग्राममध्ये तिघांनी एका मुस्लिम व्यक्तीला जबरदस्तीनं सलूनमध्ये नेऊन त्याला दाढी कापायला लावली होती. या प्रकरणात तिघांना गुरुग्रामच्या सेक्टर 37 मधून ताब्यात घेण्यात आलं. एकलक्ष, गौरव आणि नितीन अशी या तिघांची नावं आहेत. यातील एकलक्ष आणि गौरवला उत्तर प्रदेशमधून, तर नितीनला हरयाणातून अटक करण्यात आली. 1 जुलै रोजी गुरुग्रामच्या खांडसा मंडीमध्ये ही घटना घडली. तीन आरोपींनी सुरुवातीला पीडित व्यक्तीचा धार्मिक कारणावरुन अपमान केला. मात्र त्यानं याकडे दुर्लक्ष केलं. मात्र वारंवार अपमान केला जात असल्यानं पीडित व्यक्तीनं पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर तिघांनी पीडित व्यक्तीला जबरदस्तीनं सलूनमध्ये नेऊन त्याची दाढी कापली.
... तर आम्ही तुम्हालाही मुस्लिम करु; ओवेसींचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 2:59 PM