जयपूर: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लीमीन(AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनी सोमवारी राजस्थान विधानसभा निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी आपला पक्ष राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. राजस्थानमध्ये आगामी विधानसभा निवडणुका 2023 च्या अखेरीस होणार आहेत. एमआयएमकडून पक्षाच्या राजस्थान युनिटची लवकरच औपचारिक सुरुवात केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना औवेसी म्हणाले की, आम्ही राजस्थानमध्ये पक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दीड-दोन महिन्यात पक्षाचा शुभारंभ होणार असून त्यानंतर पक्षाचे काम सुरू होईल. अधिकृतपणे पक्षाची सुरुवात झाल्यानंतर आम्ही जबाबदार लोकांशी बोलू आणि पक्षाची कामे सुरू करू. आमचा अनेकांना जोडण्याचा प्रयत्न असणार आहे, असं ते म्हणाले.
राजस्थान विधानसभा निवडणूक लढवणार
राजस्थानमध्ये किती जागा लढवणार ? या प्रश्नावर औवेसी म्हणाले, आम्ही पक्ष सुरू केला तर निवडणूक लढवणार हे नक्की. पण आता सध्या आम्ही उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये व्यस्त आहोत. दीड-दोन महिन्यात चित्र समोर येईल, असंही ते म्हणाले. यावरुन आता एका पाठोपाठ एक एमआयएम देशातील मोठ्या राज्यांमध्ये आपला पक्ष वाढवण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. राजस्थानमध्ये पक्षाला किती यश मिळेल, हे येणारा काळच ठरवेल.