नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस -ए- इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) हा पक्ष मुस्लीमांना मित्र वाटत असला तरी, तो त्यांचा शत्रू आहे. या पक्षाच्या भुलथापांना मुसलमानांनी बळी पडू नये, अशी परखड टीका काँग्रेसचे राज्यसभा सदस्य हुसेन दलवाई यांनी शुक्रवारी येथे केली.
दलवाई म्हणाले, मुस्लीमांच्या विकासासाठी मुस्लीम ओळख असलेला पक्ष नको, जात व धर्माची ओळख असलेला कोणताही पक्ष भारतीय लोकशाहीसाठी पोषक नाही, असे सांगून ते म्हणाले की, एआयएमआयएम हा धर्माचा विखारी प्रचार करतो आहे. तसेच त्याचे भाजपाशी साटेलोटे असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एमआयएमने केलेला प्रवेश भाजपाला हाताशी धरून झाला असावा. मित्रच्या स्वरूपात हा शत्रू घरात शिरू पाहत आहे. राज्यात जिथे जिथे या पक्षाच्या उमेदवाराची सरशी झाली तिथे मतविभाजनासाठी भाजपाने त्यांना मदत केली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला़ भाजपा व एमआयएममध्ये फरक नाही. ते दोघेही परस्परांना मदत करतात. केंद्रात व महाराष्ट्रात आता जातीयवाद्यांचे सरकार आलेले आहे. त्यामुळे अशा पक्षाचे फावेल. हिंदू धर्मनिरपेक्ष भावनेने जगतो, पण एमआयएमसारख्या विखारी प्रवृत्तीच्या उदयामुळे हिंदूंच्या मनात भारतीय मुस्लीमांबद्दल संभ्रम निर्माण होतात, उत्तम समाजनिर्मितीसाठी विघटनाची ही भावना उपटून काढली पाहिजे. शाही इमामांनी नवाज शरीफ यांना पाठवलेल्या निमत्रणासंदर्भात दलवाई म्हणाले, धार्मिक सोहळ्य़ापासून राजकीय नेत्यांना दूरच ठेवले पाहिजे. (विशेष प्रतिनिधी)