हैदराबाद - तेलंगणा विधानसभा मतदारसंघात तेलंगणा राष्ट्र समितीने बाजी मारली आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवाडीनुसार टीआरएसने 22 जागांवर विजय मिळवला असून 66 जागांवर आघाडी आहे. तर एमआयएमने 3 जागांवर विजय मिळवला आहे. त्यापैकी, अकबरुद्दीन ओवैसी हे एमआयएमचे पहिले विजयी उमेदवार आहेत. तर चारमिनार मतदारसंघातून एमआयएमच्या मुमताज अहमद खान यांना विजय मिळाला आहे.
तेलंगणात हैदराबादमधील 15 विधानसभा मतदारसंघापैकी महत्वाचा मानला जाणाऱ्या चारमिनार मतदारसंघात एमआयएमला यश मिळाले आहे. या मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार मुमताज अहमद खान यांना 53475 मतं मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार टी उमा महेंद्र यांना 20707 मतं मिळाली आहेत. ही आकडेवारी दुपारी 1.26 वाजेपर्यंतची आहे. मात्र, एमआयएम उमेदवाराला जवळपास 33 हजार मतांची आघाडी असल्याने येथून खान यांचा विजय निश्चित झाला आहे. तर या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार मोहम्मद घोऊस यांना 16514 मतं मिळाली आहेत. त्यामुळे चारमिनारचा गड राखण्यात एमआयएमला यश आलं आहे.
दरम्यान, यापूर्वी शिवसेनेच्या सामना मुखपत्रातील अग्रलेखाला औवेसींनी उत्तर दिले होते. हैदराबादमधील चारमिनार हे आमच्या पूर्वजांची निशाणी आहे. आमच्या संस्कृतीची ओळख असून वास्तुकलेचा उत्तम नमूना आहे, असे म्हणत भाजपाध्यक्ष अमित शहा आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवावी असे औवेसींनी म्हटले होते. चारमिनार मतदारसंघातील निकालानंतर ओवैसींनी मतदानातून अमित शहांना उत्तर दिल्याचं दिसून येत आहे.