नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मिमिक्रीनं प्रकाशझोतात आलेला विनोदवीर श्याम रंगीलानं राजकारणात प्रवेश केला आहे. आम आदमी पक्षात प्रवेश करत श्याम रंगीलानं नवी इनिंग सुरू केली आहे. आपचे राजस्थान निवडणूक प्रभारी विनय मिश्रा यांनी श्यामचं पक्षात स्वागत केलं.
लोकांच्या उदास चेहऱ्यांवर आपल्या मिमिक्रीनं हसू फुलवणारे श्याम रंगीला आता कलेसोबतच देशात कामाचं राजकारण करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या साथीनं शिक्षा आणि आरोग्य क्षेत्रात क्रांतीची ज्योत पेटवतील, अशा शब्दांत आपनं श्याम यांचं स्वागत केलं आहे. श्याम रंगीलानं आपचं ट्विट रिट्वट केलं आहे. 'राजस्थानलाही कामाच्या राजकारणाची गरज आहे. आम्ही कामाचं राजकारण आणि आपच्या सोबत आहोत,' असं रंगीलानं म्हटलं आहे.
दोनच दिवसांपूर्वी श्यामनं दिल्लीत आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवालांची भेट घेतली होती. दिल्लीतल्या सरकारी शाळा आणि मोहल्ला क्लिनिकची पाहणी श्याम यांनी केली होती. दिल्ली सरकारच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं होतं. दिल्ली पाठोपाठ पंजाबमध्ये आपचं सरकार आलं. भगनंत मान या सरकारचं नेतृत्त्व करत आहेत. विशेष म्हणजे मान राजकारणात येण्याआधी विनोदवीर होते. तर श्याम रंगीलादेखील उत्तम कॉमेडी आणि मिमिक्री करतात.