संभल: ऑन इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) आणि वादाचे जुने नाते आहे. आता पक्षाच्या एका पोस्टरवरुन नवा वाद सुरू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात एआयएमआयमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा आज होत आहे. या सभेपूर्वीच पक्षाचे पोस्टर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. जाहीर सभेच्या पोस्टरमध्ये संभलला 'गाझींची भूमी' म्हणून संबोधल्याबद्दल वाद निर्माण झाला आहे.
या जाहीर सभेसाठी शहरात लावण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये संभलला 'गाझींची भूमी' म्हणजेच 'इस्लामच्या शूर योद्ध्यांची भूमी' असे म्हटले आहे. यावरुन वाद निर्माण झाला आहे. या पोस्टर्सवर भारतीय जनता पक्षाने तीव्र आक्षेप नोंदवला. यानंतर शहरातून हे पोस्टर काढण्यात आले.
भाजपचे पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश सिंघल यांनी या पोस्टर्सबाबत म्हटले आहे की, "संभल कधीही गाझींची भूमी कधीच नव्हती. हा ओवेसींचा निवडणुकीसाठी स्टंट आहे. पण, आम्ही त्यांच्या योजना कधीच यशस्वी होऊ देणार नाही. संभल हे एक पौराणिक शहर आहे. पुराणांमध्ये संभल बद्दल कल्की अवतारचा उल्लेख आहे. भारतातील कोणतेही शहर गाझींचे नव्हते."
एमआयएम शंभर जागा लढवणारलवकरच उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी एमआयएमने तयारी सुरू केली आहे. पहिल्यांदाच एमआयएम उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक लढवत असून, पक्षाने राज्यात 100 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी सक्रियपणे काम करत आहेत.