अमरावती : आंध्र प्रदेशातील कडापा जिल्ह्यात चुणखडीच्या खाणीत शनिवारी झालेल्या शक्तिशाली जिलेटिन स्फोटात ९ कामगार ठार झाले. स्फोट इतका भीषण होता की, कामगारांच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटविणे कठीण झाले आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांत पुलिवेंदुला विधानसभा मतदारसंघातील कामगारांचा समावेश आहे. पुलिवेंदुला हा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांचा मतदारसंघ आहे. (Mine blast in Andhra Pradesh 9 people died)
कडापाचे पोलीस अधीक्षक के. अंबुराजन यांनी सांगितले की, मामिल्लापल्ली गावाबाहेरील चुनखडीच्या खदानीत एका वाहनातून जिलेटिन कांड्यांची एक खेप उतरवून घेतली जात असताना स्फोट झाला. स्फोटामुळे वाहन छिन्नविच्छिन्न झाले. जिलेटिन कांड्या बुडवेल येथून आणण्यात आल्या होत्या.
अंबुराजन यांनी सांगितले की, चुणखडीची खान परवानाधारक असून, जिलेटिनची खपसुद्धा मान्यताप्राप्त संचालकानेच आणलेली होती. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केेलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली.
- कामगारांच्या मृत्यूबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला असून, मृतांच्या कुटुंबांप्रति सहवेदना प्रकट केली आहे.- राज्याचे विरोधी पक्षनेते एन. चंद्राबाबू नायडू यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, मृतांच्या परिवारांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे.