नवी दिल्ली: तिहार तुरुंगाच्या परिसरातून एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याला सहा मोबाईल, परफ्युमच्या बाटल्या, विदेशातून मागवण्यात आलेली चॉकलेट्स, बिस्किट्स अशा वस्तू सापडल्या आहेत. तुरुंगाजवळ उभ्या असलेल्या एका टोयोटा इनोव्हा गाडीतून या वस्तू आणण्यात आल्या होत्या. घर खरेदीदारांना ताबा न दिल्यानं तुरुंगाची हवा खात असलेल्या अजय आणि संजय चंद्रा यांची तुरुंगात उत्तम बडदास्त ठेवली जात असल्याचं अधिकाऱ्यानं केलेल्या पाहणीतून समोर आलंय.बुधवारी संध्याकाळी एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याला टोयोटा इनोव्हा गाडीत सहा मोबाईल, परफ्युमच्या बाटल्या, विदेशातून मागवण्यात आलेली चॉकलेट्स, बिस्किट्स अशा वस्तू सापडल्या. यानंतर अधिकाऱ्यानं गाडीच्या चालकाजवळ चौकशी करताच, त्याचं नाव विक्रांत महंत असल्याचं समोर आलं. विक्रांत युनिटेक लिमिटेडचे मालक आणि संचालक अजय आणि संजय चंद्रा यांचा कर्मचारी आहे. पाचशे घर खरेदीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी चंद्रा बंधू गेल्या एप्रिल महिन्यापासून तुरुंगात आहेत. तुरुंग परिसरात सापडलेल्या वस्तूंमुळे अधिकाऱ्यांनी तुरुंगात जाऊनही तपास केला. यावेळी त्यांना चंद्रा बंधू असलेल्या तुरुंगात परफ्युमच्या बाटल्या, चॉकलेटचे बॉक्स, एक लहान फ्रिज, दोन मोबाईल, दोन कॉर्डलेस फोन आणि दोन कॉम्प्युटर सापडले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश तिहार तुरुंगाचे महासंचालक अजय कश्यप यांनी दिलेत. ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं चंद्रा बंधूंची रवानगी तुरुंगात केली आहे. चंद्रा बंधूंची संपत्ती विकून ग्राहकांचे पैसे देण्यात यावेत, असे आदेशही न्यायालयानं दिलेत.
मिनी फ्रिज, परफ्युम आणि बरंच काही... 'त्या' कैद्यांची तुरुंगात विशेष सरबराई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 3:51 PM