नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या टिप्पणीची स्वतःहून दखल घेतली आहे. कर्नाटक हायकोर्टच्या न्यायाधीशांनी बंगळुरू इथं सुनावणीवेळी मुस्लीम वस्त्यांचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख केला होता. त्यावर सुप्रीम कोर्टाने कर्नाटक हायकोर्टाला उत्तर मागितले आहे.
बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार, सरन्यायाधीश चंद्रचूड, न्या. राजीव खन्ना, न्या. बी.आर गवई, न्या. सूर्यकांत आणि न्या ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने कर्नाटक हायकोर्टच्या रजिस्ट्रर जनरलकडून रिपोर्ट मागितला आहे. कर्नाटक हायकोर्टातील न्या. श्रीशानंद द्वारे काही टिप्पणीकडे आमचे लक्ष गेले. त्यानंतर आम्ही एजी आणि एसजी त्यांच्याकडे सल्ला मागितला. आम्ही हायकोर्टच्या रजिस्ट्रार जनरलकडे एक रिपोर्ट मागवला असल्याचं खंडपीठाने सांगितले.
न्या. श्रीशानंद यांचे व्हिडिओ व्हायरल
कर्नाटक हायकोर्ट न्यायाधीश श्रीशानंद यांचे २ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यात ते वादग्रस्त टीप्पणी करताना दिसतात. त्यात ते बंगळुरुतील मुस्लीम बहुल भागाला मिनी पाकिस्तान म्हणतात तर दुसऱ्या व्हिडिओत ते महिला वकीलावर असंवेदनशील टीप्पणी करताना ऐकायला मिळतात. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
सोशल मीडियाच्या जगतात आपल्यावर करडी नजर - सरन्यायाधीश
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या प्रकरणाची दखल घेत अटॉर्नी जनरल आर वेंकटरमणी यांना सांगितले की, आम्ही काही मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे सेट करू शकतो. सोशल मीडियाच्या या युगात आपल्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाते आणि आपण त्यानुसार वागले पाहिजे असं सरन्यायाधीशांनी म्हटलं.