नवी दिल्ली : देशातील लाेकसभेच्या तीन आणि विधानसभांच्या सात जागांसाठी झालेल्या पाेटनिवडणुकीत भाजपने लाेकसभेच्या दाेन आणि विधानसभेच्या तीन जागांवर विजय मिळविला. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचा गड मानल्या गेलेल्या रामपूर आणि आझमगड लाेकसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळवून अखिलेश यादव यांना दणका दिला आहे. तर पंजाबच्या संगरूर लाेकसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीला पराभवाचा धक्का बसला आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला त्रिपुरा राज्यातच यश मिळाले. रामपूर येथून भाजपचे उमेदवार घनश्याम लाेधी यांनी सपाचे आसिम राजा यांचा ४२ हजारहून अधिक मतांनी पराभव केला. तर आझमगडमध्ये भाजपचे दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ यांनी सपाचे धर्मेंद्र यादव यांच्यावर जवळपास १० हजार मतांनी विजय मिळविला. आझमगडमध्ये भाजप आणि सपामध्ये चुरशीची लढत झाली. अखेरच्या फेरीची मतमाेजणी हाेईपर्यंत निकाल काेणाच्या बाजूने झुकेल, असे सांगता येत नव्हते. संगरुरमध्ये शिरोमणी अकाली दल (अमृतसर)चे सिमरनजीत सिंह मान यांनी सुमारे ६ हजार मतांनी निसटता विजय मिळविला. शिराेमणी अकाली दलाच्या कमलदीप काैर राजाेआना, काॅंग्रेसचे दलबीरसिंह गाेल्डी आणि भाजपचे केवलसिंह धिल्लाे यांचे डिपाॅझिट जप्त झाले.
उत्तर प्रदेशात ‘सपा’ला दुफळीचा धक्काउत्तर प्रदेशातील आझमगड व रामपूर हे दोन्ही मतदारसंघ समाजवादी पार्टीचे बालेकिल्ले मानले जातात. गेल्या निवडणुकीत आझमगडमधून अखिलेश यादव तर रामपूरमधून आझम खान निवडून आले होते. परंतु यावेळी हे दोन्ही मतदारसंघांवर भाजपने कब्जा करून सपाला जोरदार धक्का दिला आहे. बसपाचे गुड्डू जमाली यांनी अडीच लाखांवर मते घेऊन सपाच्या पराभवाला साहाय्य केले. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघात नोटाची मते जवळपास १० हजारावर आहे. मुख्यमंत्री माणिक साहा विजयीदेशातील सात विधानसभा पोटनिवडणुकीपैकी भाजपने ३ जागांवर विजय संपादन केला. यात त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांचाही समावेश आहे. टाऊन बार्डोवाली या मतदारसंघातून साहा निवडून आले. त्रिपुरातील चार विधानसभा पोटनिवडणुकीपैकी ३ जागांवर भाजपने यश संपादन केले. एका जागेवर काँग्रेसने विजय मिळविला.दिल्लीत आपचा करिष्मा कायमदिल्लीतील राजेंद्रनगर विधानसभा पोटनिवडणुकीत आपचे दुर्गेश पाठक यांनी १२ हजारांहून अधिक मतांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून दिल्लीत अद्यापही आपचा प्रभाव असल्याचे सिद्ध केले आहे. राघव चढ्ढा यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आपला जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न भाजपने केला. दिल्लीत काही महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठीसुद्धा ही निवडणूक महत्त्वपूर्ण होती. परंतु आपने दिल्लीत करिष्मा कायम राखला.
संगरुरमध्ये ‘काटे की टक्कर’असेच चित्र संगरुरमध्ये दिसून आले. सिमरनजितसिंह मान यांनी केवळ ५ हजार ८२२ मतांनी ‘आप’चे गुरमेलसिंह यांचा पराभव केला. संगरुरमध्ये केवळ ४६ टक्के मतदान झाले हाेते. त्याच वेळी ‘आप’चा पराभव निश्चित मानला जात हाेता. सिमरनजित सिंग मान यांनी विजय संपादन करून पंजाबच्या राजकारणाला वेगळे वळण मिळण्याचे संकेत दिले आहेत. शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकारने खलिस्तानी चळवळ ठरविण्याच्या धोरणाने सिमरनजित सिंग मान यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला खतपाणी घातले.
विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघ विजयी उमेदवार१. आत्माकुर (आंध्र प्रदेश) मेकापट्टी विक्रम रेड्डी (वायएसआर काँग्रेस)२. मंदार (झारखंड) शिल्पी नेहा तिर्की (काँग्रेस)३. राजेंद्रनगर (दिल्ली) दुर्गेश पाठक (आप)४. अगरतळा (त्रिपुरा) सुदीप रॉय बर्मन (काँग्रेस)५. जुबराजनगर (त्रिपुरा) मलिना देबनाथ (भाजप)६. सुरमा (त्रिपुरा) स्वप्ना दास पॉल (भाजप)७. टाऊन बार्डोवाली (त्रिपुरा) माणिक साहा - (भाजप) लाेकसभा पाेटनिवडणूक१. आझमगड दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ (भाजप)२. रामपूर घनश्याम लाेधी (भाजप)३. संगरुर सिमरनजीत सिंह मान (शिरोमणी अकाली दल (अमृतसर))
गलिच्छ राजकारणाचा पराभवमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या विजयावर ट्विट करून राजेंद्रनगरातील मतदारांचे आभार मानले आहे. राजेंद्रनगरातील या विजयाने दिल्लीच्या लोकांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळते, असे ट्विटवर त्यांनी म्हटले आहे. दिल्लीच्या लोकांचे प्रेम व स्नेहाचा मी आभारी आहे. लोकांनी भाजपच्या गलिच्छ राजकारणाचा या निवडणुकीत पराभव केल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.