नवी दिल्ली : राज्यसभेत प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मंत्रीच उपस्थित नसल्यामुळे सोमवारी सरकार पेचात सापडले होते. राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी गेल्या अनेक वर्षांत अशी असाधारण परिस्थिती निर्माण झाल्याचे मी बघितले नाही, असे म्हटले. काँग्रेसचे सदस्य महेंद्र सिंह माहरा यांनी दिल्ली आणि एनसीआरमधील हवा आणि आवाजाच्या प्रदूषणासंबंधीचा यादीत असलेला प्रश्न पर्यावरण आणि वनमंत्र्यांना प्रश्नोत्तर तासात विचारला होता. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी मंत्री अनुपस्थित असल्याबद्दल आक्षेप घेतला आणि असे (मंत्र्यांची अनुपस्थिती) दुसऱ्यांदा घडले असल्याचे निदर्शनास आणले. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर पर्यावरण मंत्री अनिल दिवेकर यांच्या वतीने या प्रश्नाला उत्तर देणार होते. त्यांनी सभागृहात उशिरा आल्याबद्दल सभागृहाची क्षमा मागितली. जावडेकर यांच्याकडे याआधी पर्यावरण खात्याची जबाबदारी होती. अन्सारी यांनी ‘अपूर्व परिस्थिती’ निर्माण झाल्याचे म्हटले. मंत्र्याने आपल्या खात्याशी संबंधित प्रश्न विचारात घेतल्यावर सभागृहात उपस्थित राहणे ही त्याची/तिची जबाबदारी आहे, असे अन्सारी म्हणाले. अशी परिस्थिती ही खूपच वेगळी असून संसदीय कामकाज मंत्री याबाबतीत लक्ष घालतील, असे म्हटले. जावडेकर सभागृहात दाखल झाले. ते म्हणाले लोकसभेत मी विधेयक मांडत असल्यामुळे यायला उशीर झाला.
उत्तरे देण्यास राज्यसभेत मंत्री अनुपस्थित
By admin | Published: April 10, 2017 11:44 PM