नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या हाथरस सामूहित बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबाची काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी भेट घेतली. यावेळी प्रियांका गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेशपोलिसांनी केलेल्या गैरवर्तनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोत एक पोलीस कर्मचारी प्रियांका गांधी यांच्या कपड्यांना पकडून खेचताना दिसून येत आहे. प्रियंका गांधींचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात योगी सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांवर टीका करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या गैरवर्तनावर आता महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर सोनिया गांधी यांचा फोटो शेअर करुन 'याची इतिहासात नोंद होईल आणि भविष्य माफ करणार नाही', अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
प्रियंका गांधींच्या या फोटोवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर हल्लाबोल केलाय. 'योगीजींच्या राज्यात महिला पोलीस नाहीत का?' असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही हा फोटो शेअर करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. 'याहून लज्जास्पद आणि घातक आणखी काही असू शकतं का?' असा प्रश्नही रणदीप सिंह सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी गुरुवारी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले होते. मात्र पोलिसांनी दोघांनाही यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी अडवण्यात आले होते. याचदरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 जणांविरोधात FIR दाखल केली आहे. मात्र शनिवारी पुन्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले होते.
यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते देखील हाथरसकडे निघाले होते. मात्र दिल्ली - नोएडा डायरेक्ट फ्लायओव्हर (डीएनडी) वर उत्तर प्रदेश पोलिसांनी हाथरसकडे निघालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखून धरलं होतं. या दरम्यान, काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांची झटापटी सुरू असताना प्रियांका गांधी गाडीतून खाली उतरल्या आणि त्यांनी पोलिसांना आपल्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्जपासून रोखण्याचा प्रयत्न केला. काही वेळाच्या धुमश्चक्रीनंतर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासहीत केवळ पाच नेत्यांना हाथरसकडे जाण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला.