प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार
यशाची बुलेट ट्रेन हार्वर्ड आणि व्हॉरटनच्या सन्मान्य फलाटांवरून जाते हे प्रत्येक भारतीय राजकीय प्रवाशाला ठाऊक असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यकुशल मंत्री अश्विनी वैष्णव यांचाही प्रवास टेक्नोक्रॅटकडून बहुस्तरीय नेताजींपर्यंत झाला. खरे तर 'आय लीग विझनेस स्कूल्स'मध्ये त्यांच्या प्रवासाचा अभ्यास होऊ शकेल.५४ वर्षीय वैष्णव सध्या रेल्वे खात्याचे पुन्हा एकदा मंत्री झाले. ते ३९वे रेल्वे मंत्री असून, ३५वे माहिती आणि नभोवाणी मंत्री तसेच दुसरे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री असा त्यांचा दबदवा आहे. त्यांच्यातील नोकरशहाचा राजकीय नेत्यात झालेला बदल लक्षणीय असून, राजकीय तसेच प्रशासकीय व्यवस्थापनात त्यांचा हातखंडा आहे.
चालू महिन्याच्या प्रारंभी मोदी यांनी वैष्णव यांना पुन्हा एकदा रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री केलेले पाहून दिल्ली दरबारी आश्चर्य व्यक्त झाले; याचे कारण भाजपच्या वर्चस्वाखालील मागचे एक दशक वगळता १९९६ पासून रेल्वे मंत्रालय प्रायः एनडीए सरकारच्या मित्रपक्षांकडे होते. परंतु, मोदी यांना वैष्णव यांचे महत्व ठाऊक आहे.प्रचलित राजकारणात वैष्णव हे जरा वेगळे उदाहरण ठरते. राज्यसभेत दुसऱ्यांदा आलेले ते भाजपचे एकमेव खासदार आहेत. अर्थात, पहिल्यांदा मात्र ते विजू जनता दलाच्या नवीन पटनायक यांच्या अनुग्रहाने राज्यसभेवर आले. २००३ मध्ये वैष्णव यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबर पंतप्रधान कार्यालयात काम केले. अटलजींच्या निवृत्तीनंतरही ते त्यांच्याबरोबर होते. 'विकसित भारत' या गंतव्याची सर्वोत्कृष्ट इंजिने म्हणून मोदी रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञानाकडे पाहतात.
माध्यमांपासून दूर राहणारे वैष्णव माहिती खात्याचे मंत्री म्हणून मोदी यांचा संदेश भारतात आणि बाहेरच्या लोकांपर्यंत त्यात कोणतीही भेसळ न करता पोहोचवतील असा इरादाही त्यामागे आहे. वैष्णव यांनी ८० वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू केल्या. २५० जिल्ह्यांतून त्या जातात आणि २.१५ कोटीहून अधिक प्रवाशांची वाहतूक या गाड्यांनी मार्चपर्यंत केली आहे. रेल्वेची प्रतिमा सुधारण्यासाठी वैष्णव यांनी त्यांचे औद्योगिक यशाचे मार्ग वापरले. शंभरहून अधिक रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला. देशात सुमारे ७४०० रेल्वेस्थानके आहेत. त्यापैकी अंदाजे १३०० रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण करण्याची योजना वैष्णव यांच्या मनात आहे. गेल्या दशकभरात रेल्वेचे अपघात कमी झाले असले तरीही मृतांची संख्या बरीच वाढली. भारतामधला सर्वात भीषण तीन गाड्यांचा रेल्वे अपघात ओडिशातील बालासोरमध्ये गेल्यावर्षी झाला. त्यात २९१ लोक मरण पावले होते.
वैष्णव एकेकाळी बालासोरचे जिल्हाधिकारी होते हा यातला एक योगायोग. मात्र, मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासह मोदी यांच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना वैष्णव यांना अद्याप पूर्ण करावयाच्या आहेत. भारतीय रेल्वे साधारणत: रोज २.३ कोटी लोक प्रवास करतात. ते कायमचे मतदार असल्याचे पंतप्रधानांचे मत आहे. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर, कार्यक्षम कारभार यामुळे वैष्णव मोदींच्या मर्जीत बसले. मोदी ज्या नवनव्या कल्पना राबवतात, त्यात वैष्णव यांचा सहभाग असतो. मोदींसाठी वैष्णव परिपूर्ण 'बाबू' आहेत. यशस्वी उद्योजक आणि कह्यात राहणारा नेता या दोन्ही गोष्टी त्यांच्यात आहेत. सनदी अधिकारी असताना त्यांनी विक्रमी वेळात ९९ सालच्या चक्रीवादळानंतर सर्व व्यवस्था सुरळीत केली होती. त्यावेळी ते वाजपेयींच्या पंतप्रधान कार्यालयातील सहसचिव अशोक सैकिया यांच्या संपर्कात आले. वैष्णव यांचे पुनर्वसनाचे काम पाहून त्यांनी त्यांना पंतप्रधान कार्यालयात २००३ उपसचिव म्हणून आणले, २००४ साली भाजपची सत्ता गेल्यावरही वाजपेयी यांनी त्यांना २००६पर्यंत खासगी सचिव म्हणून ठेवले. याच काळात त्यांचा मोदींशी संबंध आला. नंतर ते २००८ साली एमबीए करण्यासाठी व्हॉरटनला गेले. अमेरिकेतून परतल्यावर त्यांनी सनदी नोकरीतून निवृत्ती घेतली आणि ते खासगी क्षेत्रात गेले.
शिक्षण अभियांत्रिकीतले, प्रशिक्षण आयटीतले आणि प्रत्यक्ष कामातून ते व्यवस्थापन गुरू झाले. २०१० ते १९ या काळात जीई ट्रान्सपोर्टेशनसाठी त्यांनी काम केले. सिमेन्ससाठी सेवा दिली. त्रिवेणी अर्थ मूव्हर्स या भारतातल्या मोठ्या खाण कंपनीत ते संचालक होते. १२ साली त्यांनी दक्षिणेतील एका प्रसिद्ध उद्योगपतीशी भागीदारी करून ओडिशात स्वतःच्या काही कंपन्या काढल्या. गुजरातमध्ये वाहनांचे सुटे भाग विकण्याचा उद्योग सुरू केला. ही गोष्ट २०१८ सालची. नंतर आठच महिन्यांनी ते राज्यसभेचे सदस्य झाले. आता ते ल्युटेन्स दिल्लीच्या निवासस्थानी राहतात; पण त्यांचे खरे घर हे 'मोदीनॉमिक्स' आणि 'मोदी पॉलिटिक्स' आहे.
वैष्णव कमी बोलतात, जास्त काम करतात, राजकारण सांभाळण्यातही त्यांचा हातखंडा आहे. भाजपच्या २५ मंत्र्यांमध्ये वैष्णव यांचा क्रमांक विसावा लागतो; तरी ते गुंतागुंतीचे राजकीय आणि आर्थिक प्रश्न हाताळण्यात तरबेज असल्याने मोदी यांना जवळचे आहेत. गतवर्षी मध्य प्रदेशच्या निवडणुकांची जबाबदारी अमित शाह यांनी त्यांच्यावर सोपवली होती. भोपाळमध्ये दोन महिने ते भाड्याच्या जागेत राहिले. भाजपची गुंतागुंतीची बूथ व्यवस्थापन यंत्रणा त्यांनी सांभाळली. ते मूळचे संघ परिवारातले नाहीत; तरी मोदी यांच्या राजकीय आणि प्रशासकीय प्रवासात त्यांच्या निकट आहेत. एकाअर्थाने या बहुआयामी मंत्र्याकडे एकमार्गी मन आणि अनेक रस्त्यांवरून एकाचवेळी चालण्याचे कौशल्य आहे.