भोपाळ: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यानं केलेल्या कृतीवर टीका होत आहे. रविवारी सतनामध्ये मुख्यमंत्री चौहान यांची सभा सुरू असताना खनिज मंत्री ब्रजेंद्र प्रताप सिंह व्यासपीठावर सुरू होते. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना सिंह त्यांच्या समोर उभ्या असलेल्या महिला उमेदवाराच्या केसात अडकलेला गॉगल काढत होते.
मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना भाजपच्या उमेदवार प्रतिमा बागरी त्यांच्या शेजारी उभ्या होत्या. तितक्यात त्यांना कोणीतरी मागून केसांना हात लावत असल्याचं लक्षात आलं. ही कृती त्यांना अनेपक्षित होती. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर असहज भाव दिसले. त्यांनी मागे वळून पाहिलं, तेव्हा केसांमध्ये अडकलेला गॉगल काढत असल्याचं ब्रजेंद्र प्रताप सिंह यांनी खाणाखुणांनी त्यांनी सांगितलं. यावरून काँग्रेसनं सिंह यांच्यावर टीका केली आहे.
भाजप नेत्याचं सतनामधील भाजपच्याच महिला उमेदवाराशी असभ्य वर्तन. भाजप उमेदवाराच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता फोटोत स्पष्ट दिसत आहे. शिवराजजी, भाजप नेत्यांपासून मुलींना वाचवायचं का? बेशर्म जयचंद पार्टी, अशा शब्दांत मध्य प्रदेश काँग्रेसनं ब्रजेश प्रताप सिंह यांचा समाचार घेतला आहे. ब्रजेश यांनी प्रतिमा बागरी यांच्या मांडीवर ठेवल्याचा फोटोदेखील काँग्रेसनं ट्विट केला आहे.