ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याचा धाडसी निर्णय जाहीर होण्याआधी केंद्र सरकारच्या वरिष्ठ पातळीवर प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय जाहीर केला. त्यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होती.
या बैठकीला आलेल्या मंत्र्यांना या निर्णयाची कल्पना देण्यात आली होती. बैठक संपल्यानंतर मोदींचे टीव्हीवरील भाषण संपेपर्यंत सर्व मंत्र्यांना थांबवून ठेवण्यात आले. कोणलाही बैठक स्थळापासून बाहेर जाऊ दिले नाही. कारण काही मिनिटेआधीही या संवेदनशील निर्णयाची माहिती बाहेर फुटणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली.
आरबीआयच्या अधिक-यांनीही पंतप्रधानांचे देशाला उद्देशून केलेले भाषण संपल्यानंतर बाहेर सोडण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीच्या फक्त १० मिनिट आधी या निर्णयाची कल्पना मिळाली. संध्याकाळी ६.४५ ते रात्री ९ वाजेपर्यंत मोदींचे भाषण संपेपर्यंत आम्ही मिटींग हॉलमध्येच थांबून होतो अशी माहिती एका मंत्र्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिली.
मंत्रिमंडळाची बैठक ७.३० वाजता संपली. त्यानंतर पंतप्रधान या निर्णयाची माहिती देण्यासाठी राष्ट्रपतींच्या निवासस्थानी गेले. पंतप्रधानांनी त्या रात्री आणखी तीन वरिष्ठ मंत्र्यांबरोबरही चर्चा केली. पंतप्रधानांच्या जपान दौ-यातील करारांचे विषय मंत्रिमंडळ बैठकीच्या अजेंडयावर होते.